ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा देशभरात होणार जागर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 6 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पाकिस्तानविरोधात यशस्वीपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने १३ ते २३ मे २०२५ या कालावधीत राष्ट्रव्यापी तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय एकता आणि तिरंगा ध्वजाचा सन्मान वाढवणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती पक्ष सूत्रांनी सोमवारी दिली.

या यात्रेत केंद्र आणि राज्यातील मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, इतर पदाधिकारी आणि सर्व स्तरांवरील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तसेच पाकिस्तानच्या सैन्याला जबर दणका देण्यात आला.

या पार्श्वभूमीवर, राष्ट्रव्यापी अभियानाच्या स्वरूपात भाजपतर्फे तिरंगा यात्रा काढली जाणार आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी दिल्लीसह काही ठिकाणी तिरंगा यात्रा काढली होती.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या संदर्भात काही लोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. या चुकीच्या दाव्यांचा खोडसाळपणा करण्याचे निर्देश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांना दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिरंगा यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी विनोद तावडे, संबित पात्रा आणि तरुण चुघ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter