संभाजीनगरमध्ये मदनी मोहल्ला बालवाचनालयाचे उद्घाटन

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Years ago
बारी कॉलनीमध्ये ‘मदनी सोशल असोसिएशन’द्वारे बालवाचनालयाचे उद्घाटन
बारी कॉलनीमध्ये ‘मदनी सोशल असोसिएशन’द्वारे बालवाचनालयाचे उद्घाटन

 

संभाजीनगर


संभाजीनगर येथील बारी कॉलनीमध्ये ‘मदनी सोशल असोसिएशन’द्वारे मदनी मोहल्ला बालवाचनालयाचे १० सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. हे वाचनालय दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुरू राहणार आहे. यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त अय्युब खान, रीड अँड लीड फौंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी तसेच मदनी सोशल असोसिएशनचे सभासद उपस्थित होते. 


यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त अय्युब खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘ही वाचनालये भविष्यात मोठी ग्रंथालये होतील. मुले पुस्तकांसोबत जोडली जावीत असे वाटत असेल तर असे प्रयोग होत राहिले पाहिजेत', अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती नदीम म्हणाले, ‘लहानमुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, सध्या मोठ्यांसह लहानमुलेही मोबाईलच्या आहारी गेले आहेत अश्यावेळी वाचनाची सवय लावण्यासाठी अशी ग्रंथालये महत्वाची भूमिका बजावतील. परिसरातील लहान मूलयांसोबतच महिलांसाठीही हे वाचनालय फायदेशीर ठरणार आहे.’

 

बारी कॉलनी येथे मदनी मोहल्ला बालवाचनालय सुरू करण्यात शफी अन्सारी यांचा मोलाचा वाटा आहे. हे वाचनालय सुरू करण्यासाठी त्यांनी राहत्या घरातील जागा दिली आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

सर्वसामान्यांमध्ये वाचनाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या 'रीड अँड लीड' या संस्थेचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी शहरात सुरू असलेल्या मरियम मिर्झा मोहल्ला बालवाचनालय या मोहिमेची ओळख करून दिली. मरियम मिर्झा या इयत्ता ९वीच्या विद्यार्थिनीच्या नेतृत्वाखाली शहरात बालवाचनालय अभियान कसे सुरू झाले, आणि त्यामागील प्रेरणा आणि उद्देश काय याविषयी नदवी यांनी माहिती दिली. या उपक्रमांतर्गत संभाजीनगर शहरात तब्बल ३४ बालवाचनालये सुरू असल्याची माहिती दिली.  


या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला मदनी सोशल असोसिएशनचे सदस्य अब्दुल मन्नान सर, शेख राज मोहम्मद, इलियास सर, मोहम्मद युनूस आर्किटेक्ट, लतीफ सर, मिर्झा असद बेग, अजमत सर आमीर जमाल, शाहनवाज सर, कमाल पटेल, नसीम भाई उपस्थित होते. यावेळी उपस्थित मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. 

 

पहा या उद्घाटनाचा व्हिडिओ 

 


'रीड अँड लीड फौंडेशन'च्या कार्याची माहिती करून देणारा हा विशेष लेखही जरूर वाचा  


 
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट, चर्चा आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -