छत्रपती संभाजीनगरचा अल खिदमाह ग्रूप बनलाय गरिबांसाठी मोठा आधार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 7 Months ago
छत्रपती संभाजीनगर : महिलांसाठी अल्पदरात शहरात सुरु केलेले रुग्णालय
छत्रपती संभाजीनगर : महिलांसाठी अल्पदरात शहरात सुरु केलेले रुग्णालय

 

गरिबांना अल्पदरात सेवा मिळावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील अल खिदमाह ग्रूप सरसावला आहे. या संस्थेने गरिबांसाठी रुग्णालय, धान्य-कपडा बँक, महिलांसाठी प्रसुती रुग्णालय, तसेच रोज गरिबांना मोफत जेवण देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे अल खिदमाह ग्रूप गरिबांसाठी मोठा आधार बनला आहे.

अल खिदमाहची सुरवात येथील अझहर इमाम यांच्या मार्गदर्शनाने अदनान चाऊस यांनी २०१९ मध्ये केली. त्यांनी सुरवातीला धान्य बँकेपासून सुरवात केली. कोरोनानंतर गरिबांसाठी दहा रुपयात रुग्णसेवा देण्याचा निर्धार केला. कटकट गेट भागात अल खिदमाह या नावाने छोटेखानी दवाखाना सुरू केला. येथे रोज दोनशे ते अडीचशे रुग्णांची दहा रुपयात तपासणी होते. तसेच त्यांना अल्पदरात औषधेही दिली जातात. धान्य बँकेतून ३५ विधवा महिलांना महिनाभराचे रेशन देतात. यात प्रामुख्याने बायजीपुरा, पडेगाव, मिसारवाडी, नारेगाव यासह विविध भागात महिलांना लाभ दिला जातो. कटकटगेट परिसरात रोज सायंकाळी दीडशे जणांना मोफत जेवण दिले जात आहे. तीन वर्षांपासून रमजान महिन्यात अनेक गरीब कुटुंबीयांना कपडे देतात.

तसेच येथे हिवाळ्यात बस, रेल्वे स्थानक, तसेच उड्डाणपुलाखाली निराधारांना मोफत चादरी वाटप करतात. महिलांसाठी त्यांनी अल्पदरात प्रसुतीगृह (दवाखाना) सुरू केला असून याठिकाणी सर्व तज्ज्ञ महिला डॉक्टर सेवा देत आहेत. अकरा महिन्यात रुग्णालयात एक हजार शंभर महिलांची प्रसुती झाली. यात ९५ सिझेरियन करण्यात आले. येथे अल्पदरात सेवा मिळत असल्याने दिवसेंदिवस नागरिकांचा कल वाढत असल्याचे येथील सदस्यांनी सांगितले. 

अल खिदमाह ट्रस्टचे संस्थापक अदनान चाऊस म्हणाले, "समाजातील सर्व गरीब घटकातील नागरिकांना येथे उपचार देण्याचे काम संस्थेने केले आहे. उपचार करताना कोणताही भेदभाव केला जात न असे अनेक दवाखाने दानशुरांनी सुरू करावेत, जेणेकरून गरिबांना त्याचा लाभ घेता येईल."  

औषधांमध्ये ४० टक्के सूट
दवाखान्यात सोनोग्राफी, रक्त तपासणीसह औषधांमध्ये चाळीस ते पन्नास टक्के सूट दिली जाते. अल खिदमाह या संस्थेत सध्या १२० सदस्य आहेत. आगामी काळात येथे सर्व सुविधांयुक्त मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचे ध्येय संस्थेच्या सदस्यांनी ठेवले आहे.

- जलील शेख, मालेगाव 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter