समता, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देणारी ईद

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 18 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

शेखलाल शेख
 
ज्याची सर्वांनी आतुरनेचे वाट पाहिली, कडक उन्हात संयमाने संपूर्ण रोजे ठेवून इबादत केली, अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा रमजान महिना बुधवारी संपला. बरकतवाला, शानवाला व मानवतेला मार्गदर्शक ठरलेल्या या महिन्याला निरोप देताना सर्वांचेच मन भरून येते. रमजान हा हिजरी वर्षाचा (कॅलेंडरचा) नववा महिना. रमजान महिना संकटावर मात करणारा, गरिबांविषयी आपुलकी, प्रेम, बंधुभाव निर्माण करणारा, संयमशीलतेचे, मानवतेचे उत्साही वातावरण तयार करणारा आहे.

श्रेष्ठत्व, ज्येष्ठत्व प्राप्त रमजान महिन्याला सर्व महिन्यांचा सरदार मानले गेले आहे. या महिन्यात पवित्र कुराण शरीफ सर्वांसाठी नाजिल झाला, म्हणजे अवतरला. रमजान महिन्यात केवळ उपाशी राहिल्याने रोजा (उपवास) होत नाही. जिभेचा रोजा (वाईट बोलू नये); कान, डोळ्यांचा रोजा (वाईट ऐकू नये व पाहू नये) संयमशीलता, दयाळू व कृपाळू वृत्ती दृढ करण्याची प्रेरणा रमजान मानवाला देत असतो. आपल्या भोवतालच्या गरीब, विधवा, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या वंचित अशा सर्वांना मदतीची प्रेरणा या महिन्यातून मिळते.

रोजे येतात प्रत्येक मोसमात
रमजानचे रोजे प्रत्येक मोसमात येतात. कधी हिवाळ्यात, पावसाळ्यात, तर कधी उन्हाळ्यात. प्रामुख्याने रमजान महिना हा रोजांचा म्हणजेच उपवासांचा महिना म्हणून ओळखला जातो. इस्लाम धर्माची इमारत कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज या पाच स्तंभांवर उभी आहे, त्यांपैकी रोजा प्रमुख होय. अरबी भाषेत रोजाला ‘सोम’ असे म्हणतात. सोमचा अर्थ बचाव करणे, थांबवणे किंवा मौन पाळणे. दाट काटेरी पाऊलवाटेवरून जाताना माणूस स्वतःला सावरून शरीराला इजा पोचू न देता आपले कपडे शाबूत ठेवून पुढे पाऊल टाकतो. त्याप्रमाणे रमजान महिन्यात प्रत्येकाने दक्षता घ्यावयाची असते. या महिन्याचे पहिले दहा दिवस ईश्‍वरी कृपेचे. पुढील दहा दिवस भक्तीचे मानले जातात. शेवटच्या दिवसांमध्ये रोजेदारांचे संरक्षण केले जाते.

महिनाभर विशेष नमाज ‘तरावीह’ आणि ‘जकात’
केवळ रमजान महिन्यात दिवसातील पाच नमाजांशिवाय रात्री विशेष नमाज अदा केली जाते, त्यास ‘तरावीह’ म्हणतात. याचे महत्त्वही रमजान महिन्यात इतर नमाजांपेक्षा

अधिक असते. वर्षातील इतर महिन्यांत ‘तरावीह’ची नमाज होत नाही. रमजान महिन्यातील रोजा, पाचवेळची नमाज, तरावीह आणि फितरा (दान) व जकात यामुळे रोजेदारांचे मन संतुष्ट होते. आपल्या उत्पन्नातून जकात काढून ती तत्परतेने गरजूंना देणेही अनिवार्य आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रत्येक व्यक्तीला जकात देणे अनिवार्य आहे. संपूर्ण रमजान महिन्यात लाखो लोक जकातच्या माध्यमातून गरजूंना मदत करतात. यामध्ये रेशन किट, रोख रक्कम, कपडे, धान्य अशी विविध प्रकारची मदत केली जाते.

शब-ए-कद्र
रमजान महिन्यातील ‘शब-ए-कद्र’ला ‘बरकतवाली रात्र’ असे संबोधले गेले आहे. या रात्री ईश्‍वरी कृपेची देणगी मिळत राहते. हजार महिन्यांपेक्षाही एक रात्र मोठी व श्रेष्ठ मानली जाते. २१, २३, २५, २७ आणि २९ या रमजानच्या तारखा ‘शब-ए-कद्र’च्या मानल्या जातात. या रात्रीत लोक ध्यानस्थ होऊन इच्छापूर्तीसाठी अल्लाहकडे दुआ करतात. रात्रभर मशिदीत इबादत करून कुराण शरीफचे पठण केले जाते. महिला, लहान मुले घरीच इबादत करतात.

ईद आनंदाचा दिवस
रमजानच्या शेवटी येते ती ईद-उल-फित्र. ईद म्हणजे आनंदाचा दिवस. चंद्रकोर दिसल्यानंतर रमजान महिना संपला, असे मानून दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत, ईदगाह मैदानात लोक एकत्र येऊन ‘ईद-उल-फित्र’ची सामुदायिक नमाज अदा करतात. गरीब, श्रीमंत असा भेदभाव विसरून सर्वजण एका रांगेत (सफ) उभे राहून रमजान उत्तमरीत्या गेल्याबद्दल अल्लाहचे आभार मानतात. आपला रोजा कबूल व्हावा, म्हणून ‘सदका-ए-फितरा’ अदा करतात. म्हणजेच दान देतात आणि विश्‍वशांतीसाठी प्रार्थना करतात. ईद-उल-फित्रच्या नमाजानंतर दूध, सुकामेवा, शेवयामिश्रित शिरखुर्मा तयार करून मित्रमंडळी, आप्तेष्टांना दिला जातो. ‘ईद मुबारक’ म्हणून एकमेकांची गळाभेट घेतली जाते.

- शेखलाल शेख

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter