मुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारे 'माय फाऊंडेशन'

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
माय फाउंडेशन या संस्थेकडून राबवण्यात येणारे उपक्रम
माय फाउंडेशन या संस्थेकडून राबवण्यात येणारे उपक्रम

 

 पूजा नायक 
 
तरुणाई म्हणजे ऊर्जा. ती ऊर्जा योग्य ठिकाणी लावली तर त्यातून एक क्रांतिकारी आणि प्रगतिशील विचार आकाराला येतो. आणि या विचारला कृतीची आणि नेकनियतीची जोड मिळाली तर त्यातून अशी संघटना उभी राहते जी समाजासाठी मैलाचा दगड ठरते. लातूरच्या तरुणांनी एकत्र येत उभारलेले 'माय फाउंडेशन' हे याचे मूर्तीमंत उदाहरण. जाणून घेऊया या संस्थेविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी...
 
ही गोष्ट आहे लातूरच्या मैसूर कॉलोनितील. समाजासाठी काहीतरी करायचे या विचारात असणाऱ्या २० तरुणांची. आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, हुंड्यासारख्या प्रथांचे वाढते प्रमाण, संवैधानिक मुल्यांची होत असलेली पायमल्ली यांसारख्या अनेक विषयांवर हे तरुण चर्चा करत. पण फक्त बोलून काही होणार नाही हेही त्यांना समजत होते. आपण समाजाचे देणे लागतो त्यामुळे काहीतरी समाजपयोगी काम केल पाहिजे, ही भावना त्या मुलांच्या मनात घर करून होती.
 
सुरुवातीला एक अनौपचारिक ग्रुप तयार करून त्यांनी काम करायला सुरुवात केली. एखाद्या गरीब कुटुंबातील घरातील मुलीचे लग्न असेल तर लग्नासाठी पैसे गोळा करून त्यांना आर्थिक मदत करत. पुढे यात सुधारणा करून पैश्याऐवजी लग्नात लागणाऱ्या वस्तू देण्याचा विचार या तरुणांनी केला. हळूहळू हे काम वाढत होते. त्यामुळे नियोजनबद्ध काम करण्याची गरज भासू लागली. याच विचारातून संस्था स्थापन करून काम करावे असा प्रस्ताव पुढे आला. याचेच फलित म्हणजे २०१४ मध्ये उभी राहलेली ‘माय फाउंडेशन’ ही संस्था. शहीद भगतसिंग यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या तरुणांनी आपल्या संस्थेचा स्थापना दिवसही २३ मार्च हा निवडला. त्यानंतर २०१५ मध्ये ‘माय फाउंडेशन’ या नावाने संस्थेची रीतसर नोंदणी झाली. 
 
या संस्थेच्या नावामागे एक रंजक अर्थ आहे. कोणत्याही गोष्टींची सुरुवात स्वतःपासून करावी अशी एक धारणा बोलून दाखवली जाते. हीच भावना इथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात रुजावी या अर्थाने हे नाव ठेवण्यात आले.  
 
‘संस्थेच्या स्थापनेनंतर ज्यांना आर्थिक मदत केली त्यांच्याकडून आमंत्रण यायला लागली. लग्नात केला जाणारा अनावश्यक खर्च आणि त्यामुळे मुलींकडील परिवाराची होणारी ओढाताण पाहून आम्ही सामुहिक विवाह (इज्तेमाई शादि) सोहळ्याचे आयोजन करण्याचा निश्चय केला. आणि २०१५ मध्ये या सामुहिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली ती आजपर्यंत चालू आहे. नुकताच ४ फेब्रुवारी रोजी एक सामुहिक विवाह सोहळा पार पडला. आजपर्यंत त्यांनी २००हुन अधिक जोडप्यांची लग्न लावून दिली. लोकांना साध्या पद्धतीने लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि  हुंड्यासारख्या इस्लामला मान्य नसलेल्या प्रथांना छेद देणे हा उपक्रम सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश आहे’, असे संस्थेचे सदस्य जुनेद अत्तार यांनी सांगितले.
 

सामुहिक विवाह सोहळा 
 
हळूहळू संस्थेची व्याप्ती आणि कामाचा वेग वाढत होता. या संस्थेची काम करण्याची एक विशिष्ट्य शैली आहे. याला एक ठोस कारण म्हणजे आपण का काम करतोय याबाबतीत असणारी स्पष्टता आणि पूर्वनियोजित कार्यपद्धती. आधी समाजातील समस्या समजून घेऊन, त्या समस्या सोडण्यासाठी कोणते उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे, याचा आराखडा बनवून नंतर काम करणे ही संस्थेची कार्यप्रणाली आहे. एका प्रश्नावर विविध पद्धतीने काम करणे हेच त्यांच्या संस्थेचे मूळ सूत्र. त्यामुळे ते अगदी नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात. कामाच्या ठिकाणी असणारा पारदर्शीपणा, प्रत्येकाला असणारे जबाबदारीचे भान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाची भावना. विशेष म्हणजे या संस्थेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य प्रकारची उतरंड नाही. इथे सर्व समान पातळीवर एक होऊन काम करतात. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था समाजाच्या अनेक पैलूंवर काम करते. यामागे फक्त एकच प्रमाणिक उद्देश आहे तो म्हणजे मुस्लीम समाजातील लोकांचा जीवनमानाचा स्तर उंचावणे. 
 
आरोग्य क्षेत्रात काम करताना सामाजिक जागरूकतेवर त्यांचा विशेष भर असतो. यासाठी ते आरोग्यविषयक जागरूकता अभियान राबवतात. यात ते सरकारी योजनांबद्दल माहिती सांगतात, गरज पडल्यास आर्थिक मदतीसाठी प्रयत्नशील असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजारी व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याचे मानसिक स्वास्थ सुदृढ राहावं यासाठी समुपदेशनही करतात.
 
सोबतच रक्तदान शिबिराचे आयोजनही ते करतात. त्यामागे सामाजिक आणि धार्मिक बाजू असल्याचे जुनैद जुनेद अत्तार यांनी सांगितले. यावर विस्ताराने बोलत असताना त्यांनी सांगितले की,  ‘मुस्लीम लोकांना येणाऱ्या अनुभवातून त्यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. मुस्लीम समाजात रक्तदानाविषयी काही गैरसमज पसरले आहेत. इस्लाममध्ये रक्तदान हराम आहे हा त्यापैकीच सार्वत्रिक पसरलेला गैरसमज. त्यामुळे मुस्लीम समाज रक्तदान करण्यास उत्सुक नसतो किंवा सहजासहजी करत नाही.  यामुळे जेव्हा त्यांना रक्ताची गरज भासते त्यावेळी ब्लड बँक त्यांना रक्त देण्यास कुरबुर करतात. त्यामुळे रक्तदान शिबीरांचे आयोजन करून मुस्लिम समाजाला रक्तदानाच महत्व समजावून सांगण्याचे फाउंडेशनने ठरवले. रक्त घेणं हराम नाही, तसंच देणंही हराम नाही, ही गोष्ट मुस्लीम समाजाच्या मनात रुजवण्यासाठी जनजागृती करण्याचे आम्ही ठरवले. सोबतच रक्तसाठा वाढवा रक्ताची गरज भासल्यास ते सहज उपलब्ध व्हावे, हा देखील या शिबिरांमागचा आमचा उद्देश होता.’ 
 
जुनैद यांनी दिलेल्या माहितीनुसार माय फाउंडेशन’ दरवर्षी २३ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. याअंतर्गत १५० हून अधिक जण रक्तदान करतात. विशेष म्हणजे रक्तदात्यांपैकी ९० टक्के जण मुस्लीम समाजातील असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शिबिराचा मुख्य हेतू यशस्वी होतोय, याचे समाधान त्यांच्या बोलण्यात जाणवत होते. 
 
संस्थेच्या आणखी उपक्रमाबद्दल माहिती देत असताना अन्वर शेख यांनी सांगितले की, ‘मुस्लीम समाजाचा उच्च शिक्षणातील टक्का वाढवा यासाठी शिक्षणासाठी स्कॉलशिप देता येईल का, या विचाराने २०२२ पासून गुणवंत विद्यार्थ्यांना शाहीन स्कॉलशिप देण्यास सुरुवात केली. या स्कॉलशिपच्या माध्यमातून गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलशिपच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. गेल्यावर्षी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला आर्थिक मदत करण्यात आली. यावर्षी ही मदत तीन लाखांपर्यंत वाढवण्याचा फाउंडेशनचा मानस आहे.’ 
 
‘महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी गळतीचे प्रमाण मुस्लीम समाजात सर्वाधिक आहे. ही गळती थांबवण्यासाठी पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय कीटचे वाटप फाउंडेशनने केले. या कीट मध्ये दप्तर, वह्या, कंपास बॉक्स इ वस्तू दिल्या जातात. यावर्षी जवळपास ५० मुलांना हे कीट देण्यात आले. येणाऱ्या काळात हा आकडा ५०० पर्यंत नेण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.’ असेही अन्वर यांनी सांगितले. 
शालेय कीटचे वाटप केल्यानंतर 
 
संस्थेच्या या समाजकार्यात आर्थिक समीकरण कशी जुळतात यावर जुनैद यांनी सांगितले की, ‘प्रत्येक सदस्य दर महिन्याला कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त त्याच्या मर्जीप्रमाणे पैसे देतात. या शिवाय समाजातील दानशूर व्यक्ती सढळ हस्ते मदत करत असतात.’  
 
मुस्लीम समाजातील तरुणांशी संवाद साधण्यासाठी फाउंडेशनकडून युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय या तीनही विषयांवर मुस्लीम तरुणांशी संवाद साधून समाजात यांविषयीची जागरूकता वाढवणे हा या मेळाव्याचा मुख्य हेतू आहे. या मेळाव्यात तब्बल ८००हून अधिक तरुणांनी सहभाग नोंदवला होता. 
 
२० तरुणांच्या मदतीने सुरु झालेल्या या संस्थेत सध्या ८५ सदस्य कार्यरत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कार्यकर्ते स्वतःची नोकरी, व्यवसाय सांभाळून  समाजसेवेच्या या कार्यात हातभार लावतात. मतदार जागृती अभियान असो की मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करिअर मार्गदर्शन सप्ताह, या संस्थेचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दहा वर्षात राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एकाही मोठ्या व्यक्तीचा सत्कार या फाउंडेशन केला नाही. 
 
मात्र यावर्षी पहिल्यांदा संस्थेतील मंडळीनी लातूर शहरातील उस्मान गुरुजींचा सत्कार करण्याचे ठरवले आहे. उस्मान गुरुजी हे त्यांच्या वयाच्या २४ व्या वर्षापासून मुस्लीम समाजाच्या विकासासाठी धडपडत आहे. कोणत्याही परताव्याची अपेक्षा न करता वयाच्या ७४ च्या वर्षीही ते अविरतपणे कार्य करत आहेत. गुरुजींच्या याच कामाचा सन्मान म्हणून माय फाउंडेशनने त्यांचा सत्कार समारंभ ठेवला होता.
 
'समाजाचे देणे लागतो' विचाराच्या या ठिणगीतून समाजाला तेजोमय करणारी ही ‘माय फाउंडेशन’. या फाउंडेशनसाठी धडपडत राहणाऱ्या मुस्लीम समाजातील या तरुणांना आवाज मराठीचा सलाम! 
 
- पूजा नायक 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter