भारताला बनवूया सर्जनशीलतेचे केंद्र - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

"आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे रचनात्मक अर्थव्यवस्थेचे (ऑरेंज इकॉनॉमी) तीन स्तंभ असून सर्जनशील अर्थव्यवस्थेचा (क्रिएटिव्ह इकॉनॉमी) चा पुढील १० वर्षांत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) मोठा वाटा असेल. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर न मोजता संगीत, कला, नृत्य यालाही महत्त्व द्यावे लागेल." असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. 

गुरुवारी (दि.१) ‘जागतिक दृक्-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे ( वेव्ह्ज) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड येथे करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. एल. मुरुगन, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, शहारुख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी गुरुदत्त, श्रीमती पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

व्हेव्ह्ज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे, तर ती संस्कृती, सर्जनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीची लाट आहे. आज जग नवीन कथांचा धांडोळा घेत असताना भारताकडे हजारो वर्षांपूर्वीच्या कथांचा कालातीत, विचारप्रवर्तक आणि खऱ्या अर्थाने वैश्विक खजिना आहे. सर्जनशील व्यक्ती ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात. चित्रपटसृष्टीतील अर्ध्वयू दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’, हा पहिला भारतीय चित्रपट ३ मे १९१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या कार्यक्रमावेळी पंतप्रधानांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास विशद केला. जगभरातील सर्जनशील व्यक्तींनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनवावे, असे आवाहन मोदी यांनी केले. 

तसेच राज कपूर यांची रशियातील लोकप्रियता, कान येथे सत्यजित रे यांची जागतिक स्तरावरून झालेली प्रशंसा, आणि ‘आरआरआर’ चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासह मिळालेले यश आदी बाबींचा उल्लेख मोदी यांनी केला. गुरुदत्त यांच्या चित्रपटांमधील काव्य, ए. आर. रेहमान यांची सांगीतिक प्रतिभा, आणि एस. एस. राजामौली यांची कथा मांडण्याची विलक्षण धाटणी नमूद करून या कलाकारांनी भारतीय संस्कृती जगभरात पोचविल्याचे मोदी यांनी सांगितले.

पंतरप्रधान मोदी आवाहन करत म्हणाले, "भारत आज चित्रपट निर्मिती, डिजिटल सामग्री, गेमिंग, फॅशन, संगीत आणि भव्य महोत्सव (लाइव्ह कॉन्सर्ट) आदींसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. देशातील अब्जावधी सृजनशील तरुणांनी आपल्या कथा जगासमोर आणाव्यात."

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’
यावेळी बोलताना माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, "आयआयसीटीच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत आहे."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले, "करमणूक क्षेत्र हे देशाच्या विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, कंटेंट कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो. या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी असून भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण तयार करीत असून यासाठी सक्षम धोरण राबविले जाईल."