ओतूर विद्यालयाने तीस वर्षांपासून जपली आहे धार्मिक सौहार्दाची परंपरा

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 29 d ago
साहित्य वाटप करताना मान्यवर
साहित्य वाटप करताना मान्यवर

 

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय व सीताबाई तांबे ज्युनिअर कॉलेज प्रतिभाताई पवार प्रशाला यांच्या वतीने गुरुवारी स्वर्गीय शिक्षण महर्षी विलास तांबे सर यांनी तीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत सर्वधर्म समभाव व हज यात्रेकरूंचा सत्कार ही परंपरा आज विद्यालयात अखंडपणे सुरू ठेवण्यात आली असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बशीर शेख यांनी दिली.

त्यानुसार तिथीनुसार शिवजयंती व रमजानच्या पवित्र महिन्याचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यालयातील मुस्लिम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इदी वाटप करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर हज यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मौलाना मोहम्मद अली यांनी रमजान महिन्याचे महत्त्व तसेच रोजा, हज, नमाज, सदका व फित्रा यांचे महत्त्व या विषयी माहिती दिली.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव वैभव तांबे, चाँद मोमीन, विघ्नहरचे संचालक नीलम तांबे, गुलाम मोमीन, फकीर तांबोळी, मौलाना मोहम्मद अली, जावेद मणियार आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाझनीन मोमीन यांनी केले. सूत्रसंचालन रामदास डुंबरे यांनी केले. आभार राहुल पिंगट यांनी मानले.