अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित 'परदेश शिष्यवृत्ती' योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्तालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे, ज्या हजारो विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नव्हता, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, विशेषतः मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी, परदेशातील उच्च शिक्षणासाठी (पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी) प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट २०२५ होती. मात्र, आता या तारखेत मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थी ९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.

या निर्णयामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना, जे कागदपत्रांची पूर्तता करू शकले नव्हते किंवा वेळेवर अर्ज भरू शकले नव्हते, त्यांना एक मोठी संधी मिळाली आहे.

अर्ज कसा कराल?
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी पूर्ण करायची आहे:
सर्वप्रथम, https://mdd-fs.trti-maha.in:85/ या वेबसाइटवर जाऊन संपूर्ण अर्ज भरावा.
आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे वाचनीय आणि सुस्पष्ट स्वरूपात ऑनलाइन सादर करावीत.
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी.

ही प्रिंट आणि मूळ अर्ज, कागदपत्रांसोबत, पुणे येथील समाज कल्याण आयुक्तालयाच्या कार्यालयात ९ सप्टेंबर २०२५ च्या सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत सादर करावा.

एक महत्त्वाची सूचना
समाज कल्याण आयुक्त, दीपा मुधोळ-मुंडे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी २०२४-२५ या वर्षासाठी यापूर्वीच अर्ज केलेला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी, www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.