मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिकच तीव्र झाले आहे. सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारपासून 'आमरण उपोषण' सुरू करण्याची घोषणा केली आहे. "उद्यापासून मी पाणी आणि वैद्यकीय उपचारही घेणार नाही," असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
शनिवारी सरकार-नियुक्त शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा फिस्कटल्यानंतर, मनोज जरांगे यांनी आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. "सरकारने मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता देणारा शासन निर्णय (GR) तात्काळ जारी करावा," अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
आपल्या भाषणात मनोज जरांगे म्हणाले, "सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये. आम्ही आमचा हक्क मागत आहोत, कोणावर उपकार करत नाही. आता चर्चा संपली आहे, उद्यापासून आरपारची लढाई सुरू होईल."
त्यांनी आझाद मैदानावरील गैरसोयींवरूनही सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "सरकार आंदोलकांना त्रास देत आहे. येथे पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयांची योग्य सोय नाही. पण आम्ही मागे हटणार नाही."
जरांगे यांच्या या घोषणेमुळे आंदोलनाच्या ठिकाणी वातावरण अधिकच गंभीर झाले आहे. हजारो मराठा आंदोलक त्यांच्या समर्थनार्थ आझाद मैदानात जमले आहेत. आता यावर सरकार काय भूमिका घेणार आणि हा तिढा कसा सुटणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.