जलील शेख
नाशिक शहरात गरीब मजुरांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे येथील गरीब व गरजू मुला-मुलींचे विवाह मोफत व्हावेत, यासाठी अनेक सामाजिक संघटनांतर्फे दर वर्षी सोहळे आयोजित केले जातात. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त मालेगाव येथील सुन्नी दावत ए इस्लामी व वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशनतर्फे दरेगाव भागातील हेरा इंग्लिश मीडियम शाळेत शंभर जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला.
सुन्नी दावत ए इस्लामीचे मौलाना अमिनुल कादरी म्हणाले की, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० वी जयंती निमित येथे विवाह सोहळा घेण्यात आला आहे. येथे कुसुंबा रस्त्यावरील गरिबांसाठी मोफत शंभर खाटांच्या रुग्णालयाचा प्रारंभ रविवारी करण्यात आला. शहरात यंत्रमाग कामगार, तरासन, भंगार यांसह गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
विवाह सोहळ्यासाठी अनेक दिवसांपासून काम सुरू होते. लग्न सोहळ्यात गरीब व गरजूंची निवड करण्यात आली. या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अनेक गरीब कुटुंबियाला आधार मिळाला आहे. सध्याची महागाई पाहता सर्व सामान्य व गरिबांना मुला-मुलींचे लग्न करणे सोपे राहीले नाही. त्यामुळे सामुदायिक विवाह ही काळाची गरज बनली आहे. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन असे विवाह सोहळे घेणे गरजेचे आहे.
विवाह सोहळ्यात वायफळ खर्च करणे टाळावे, श्रीमंतांनी त्यांचा मुलांचा विवाह करताना गरीब तीन मुलांचे विवाह करावे. त्यामुळे अनेक गरीब मुले-मुली संसाराला लागतील, तसेच वायफळ खर्च टाळून गरीब मुलांना शिक्षणाचा प्रवाहात आणावे. गरीब मुले शिकले तर समाजाची प्रगती होईल. समाजातील अनेक मुले हुशार आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व शिक्षण मिळत नसल्याने ते मागे पडतात. विवाहात गाजावाजा न करता साधे व सोपे लग्न करण्याचे त्यांनी येथे उपस्थितांना सांगितले. त्यांनी शंभर लग्न (निकाह) एकत्रित लावले.
साहित्य अन् भोजन
विवाह सोहळ्यात मालेगाव, सुरत, सिल्लोड या भागातील जोडपे उपस्थित होते. विवाहात जोडप्यांना सर्व संसारोपयोगी वस्तू मोफत देण्यात आल्या. या ठिकाणी ३ हजार नागरिकांना मोफत जेवण ठेवण्यात आले होते. यावेळी मुंबई येथील मौलाना शाकिर नूरी व वर्ल्ड मेमन जमातीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.