मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यातील आमरण उपोषणाने आता एका चळवळीचे स्वरूप घेतले आहे. २९ ऑगस्टपासून ऐतिहासिक आझाद मैदानावर सुरू असलेल्या या उपोषणाने राज्यभरातून मराठा आंदोलकांना एकत्र आणले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या मागणीतून उभ्या राहिलेल्या आरक्षण लढ्याला वेगवेगळ्या स्तरावरून पाठिंबा मिळत आहे.
मुंबईत दाखल झालेल्या या आंदोलकांना महापालिका प्रशासनाने हॉटेल आणि शौचालये बंद करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जरांगे यांनी केला आहे. या अडथळ्यामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ वाढला आहे. शनिवारी रात्रीपासून विविध भागांतून जेवण, पाण्याच्या बाटल्या, नाश्ता, रेनकोट आणि इतर आवश्यक वस्तूंसह मदतीचे ट्रक आझाद मैदानाजवळ पोहोचत आहेत. हा ओघ केवळ मराठा समाजापुरता मर्यादित राहिला नसून त्यात मुस्लिम समाजाचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
या मराठा आंदोलनानिमित्त महाराष्ट्रभरातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा समाजाच्या पाठीशी गावातील मुस्लीम समाज सर्वोतपरी मदत करून गावगाड्याच्या स्तरावर असणारी सौहार्दाची वीण घट्ट करण्यासाठी हातभार लावतोय. अनेकांनी तर मराठा बांधवांसमवेत गावाकडून मुंबईच्या दिशेने कूच केली. तर दुसरीकडे मुंबईत आलेल्या आंदोलकांच्या मदतीसाठीही अनेक मुस्लीम संघटना आणि कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या आश्वासक घटनांपैकी काही निवडक घटना संकलित स्वरूपात मांडणारा ‘आवाज द व्हॉइस मराठी’चा हा विशेष रिपोर्ट.
महाराष्ट्रभरातील मुस्लिमांचा आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रभरातील मुस्लिमांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मुस्लीम समाज विविध पद्धतीने आंदोलनात आपला सहभाग नोंदवत आहेत. राज्यातील अनेक भागातून मुस्लीम आंदोलनात सहभागी झाले आहेत, तर अनेकांनी आंदोलकांच्या जेवणाची सोय केली आहेत.
पुण्यातील मुस्लिम मावळ्यांकडून भोजनाची व्यवस्था
मुस्लिमबहुल कोंढवा आणि कौसरबाग परिसरातील मुस्लीम समाजाने मराठा आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. या परिसरातील मुस्लिमांनी मुंबईतील आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. ‘मुस्लिम मावळा फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हाजी गफुर पठाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुस्लीम समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे.”
ते पुढे म्हणाले की, “मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक दोन दिवसांपासून आझाद मैदान इथं आंदोलन करत आहेत. मुंबईत आंदोलकांची अनेक गैरसोय होत आहे. त्यांना शासनाकडून कोणतीही सुविधा पुरवली जात नाही. त्यामुळं आम्ही खारीचा वाटा म्हणून आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्था करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘एकोप्याचा आदर्श’ तसेच हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दिलेला ‘इंसानियात का पैगाम’ घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो आहोत. ”
सोलापूरमधील मुस्लिमांचा सक्रीय सहभाग
सोलापूरमध्ये छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा, मुस्लीम आणि दलित समाज मुंबईमधील आंदोलनात सहभागी झाला आहे. सक्रीय सहभागाविषयी बोलताना ‘छत्रपती मुस्लीम ब्रिगेड’चे कार्यकर्ते म्हणाले की, “जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार तोपर्यंत आम्ही मनोज जरांगेंसोबत मुंबईत राहणार. सोलापुरातील सर्व मुस्लीम त्यांच्या पाठीशी आहेत याची ग्वाही मी देतो.”
पिंपरी चिंचवडमधून भाजी-भाकरीचा शिदा
पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतील मुस्लीम समाज मराठा आंदोलकांसाठी मुंबईत धावून गेला आहेत. ‘मराठी मुस्लीम समाज चळवळ’ या संस्थेकडून आंदोलकांसाठी भाजी-भाकरीही शिदा देण्यात आला आहे. यावेळी बोलताना संस्थेचे कार्यकर्ते म्हणाले की, “आमच्या संस्थेकडून महाराष्ट्रातील विविध भागातून १०,००० लोकांच्या जेवणाचे नियोजन करण्यात आले आहे. कुदळवाडीतून आम्ही पंधराशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. इथे येणारं सगळं जेवण आम्ही आमच्या घरात तयार करतोय.”
ते पुढे म्हणतात की, “इथे आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांच्या एका वेळच्या जेवणाचे सुद्धा हाल आम्ही होऊ देणार नाही. मराठा-मुस्लीम एक आहेत आणि कायम एक राहणार. आंदोलनाला यश मिळवून देण्यासाठी आम्ही मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. जोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार, तोपर्यंत आम्ही पिंपरी-चिंचवडवरून इथे आझाद मैदानावर जेवण आणत राहू आणि आमच्या मराठा बांधवांना खाऊ घालत राहू.”
भिवंडीतील मुस्लिमांची मराठ्यांना खमकी साथ
मुंबईत मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याचे लक्षात येताच भिवंडीतील मुस्लिम त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी ५,००० लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. आंदोलकांसाठी पाण्याच्या बॉटल्स आणि व्हेज पुलाव ते घेऊन आले. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हटले की, “आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, त्यामुळे आज आम्ही मराठा बांधवांना साथ द्यायला भगवे गमछे घालून इथे उपस्थित आहोत.”
ते पुढे म्हणतात, “जोपर्यंत मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईमध्ये असतील, तोपर्यंत एकही बांधव उपाशी राहणार नाही. मनोज जरांगे सर्वसामान्य मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढत आहेत, त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या सोबत आहोत.”
बीडच्या वृद्धांचा ‘चलो मुंबई’ नारा
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये चलो मुंबईची चावडी बैठक पार पडली. यावेळी पिंपळगावातील काही मुस्लीम वृद्धांनी या बैठकीला आवर्जून हजेरी लावली. तसेच आंदोलनाकरिता मुंबईला जाण्यासाठी ते आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित नईमुद्दिन बडेमिया म्हणाले की, “आमच्या चार या गावात गेल्यात. आम्ही मुस्लीम-मराठा सगळे सोबत राहिलोय.”
ते पुढे म्हणतात की, “आरक्षणासाठी अख्खं गाव एकत्र आलंय मग आम्ही का मागे राहायचं. आम्ही पहिल्यापासून सगळे सण-उत्सव एकत्र साजरे करतोय मग अशावेळी सुद्धा आम्ही आमच्या मराठा बांधवांसोबत आहोत.”
अल्पसंख्याक विकास मंडळाची स्वच्छता मोहीम
राज्यभरातून आंदोलक एकत्र आल्याने आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. पालिकेचे कर्मचारी आपापल्या परीने सेवा देत असले तरी ती अपुरी पडत आहे. त्यामुळे मुस्लिम सामाजिक संघटना, अल्पसंख्याक विकास मंडळ आणि शरीफ देशमुख फाउंडेशनच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेत तब्बल १५० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. हे स्वयंसेवक सफेद टी शर्ट, झाडू, डस्टबीन, प्लॅस्टिक पिशव्या घेऊन आझाद मैदान, महापालिका चौक, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, हुतात्मा चौक आदी परिसरात स्वच्छता राबवत आहेत.
अल्पसंख्याक विकास मंडळाच्या कार्यकर्त्या फरहत देशमुख म्हणाल्या की, “मराठा आमचे बांधव आहेत. ते न्यायाच्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. त्यांना सर्व स्तरांतून मदत मिळत आहे, मात्र खाद्यपदार्थ वाटपामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचतोय. पालिकेची यंत्रणा प्रयत्नशील आहे, पण त्यांना हातभार लावण्यासाठी आम्ही ही मोहीम सुरू केली आहे. मराठा बांधवांसाठी आम्ही हातात झाडू घेतला. एकमेकांसाठी पुढे येणे, हीच खरी महाराष्ट्राची ताकद आहे.”
देशमुख फाउंडेशनचे अध्यक्ष शरीफ देशमुख म्हणाले की, “महाराष्ट्र हे जाती, धर्मापलीकडे बंधुभाव जपणारे राज्य आहे. मराठा आंदोलनासाठी लढताना त्यांच्या पाठीशी समाजातील इतरांनी उभे राहणे म्हणजे खरी आपल्या महाराष्ट्रधर्माची शिकवण आहे.”
वरवंडमधून आपुलकीचा घास
मराठा आंदोलकांना महाराष्ट्रभरातून विविध प्रकारचे अन्नदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर वरवंडमधील मुस्लीम सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर सैय्यद यांनी देखील मोलाचा वाटा दिला आहे. वरवंडमधील मुस्लीम समाजाच्या वतीने मराठा आंदोलकांना शिदा पोहोचवण्यात आला आहे.
फुलंब्रीतील मुस्लीम मावळ्यांचे जोरदार प्रदर्शन
फुलंब्रीतील मुस्लीम समाजाने मुंबईतील आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. 'मराठा आरक्षण द्या, समाजाला न्याय द्या', एक मराठा - लाख मराठा, या घोषणा देऊन आंदोलनाला अधिक जोम दिला. मुस्लिमांनी गणेशोत्सवानिमित्त गणेशाची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांचे एकत्रित बॅनर तयार करून त्यावर पाटलांचा 'मुस्लिम मावळा' अशी संबोधून फलक हाती घेतले. 'मुस्लिम मावळा' बॅनरमुळे या आंदोलनाला सामाजिक सलोख्याचा नवा आयाम मिळाला.
मोर्चामध्ये सहभागी झालेले फुलंब्रीचे मुस्लीम मावळे अजहर सय्यद यांनी सांगितले की, “मराठा समाज हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आहे. हा समाज शेतकरी, सैनिक आणि जनतेच्या हक्कासाठी सदैव लढणारा असल्याने त्यांच्या न्याय मागण्यांना आम्ही पाठिंबा देतो. समाजाला न्याय मिळवून देणे ही काळाची गरज आहे. या लढ्यात आम्ही मुस्लिम मावळे मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
लासलगावच्या मुस्लिम भगिनींची शिदोरी
आंदोलनस्थळी अन्न-पाण्याचा तुटवडा लक्षात घेत लासलगाव येथील मुस्लीम महिलांनी मराठा बांधवांसाठी खास भाकऱ्या आणि पोळ्या तयार करून दिल्या आहेत. जवळपास २० मुस्लिम महिलांनी तब्बल २,५०० भाकऱ्या बनवून कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केल्या.
गेवराईतील मुस्लिमांनी थेट गाठली मुंबई
गेवराईतील तब्बल चार डझनहून अधिक मुस्लिम स्वखर्चाने मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व कुरेशी समाजाचा सुरुवातीपासूनच पाठिंबा असल्याचे, गेवराईतील मुस्लिमांनी सांगितले. यावेळी उपस्थित मोमीन शेख, सय्यद रियाज, अतिक कुरेशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. सय्यद रियाज बोलताना म्हणाले की, “आंदोलन जोपर्यंत सुरू राहील, तोपर्यंत आम्ही मुंबईत ठाण मांडून बसणार. गेवराईपासून मुंबईपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आलो आहोत, तर आरक्षण घेऊनच जाणार.”
मेहबूबच्या हलगीने आंदोलनाला बळ
आझाद मैदानावरच्या गर्दीत बीडचा मेहबूब बाबा शेख हा हलगी वाजवून आंदोलकांचा उत्साह वाढवतोय. सोनवळा गावातील मेहबूबने लहानपणीच आपल्या आईला गमावले. असे असताना त्याला गावातील मराठा समाजाचा आधार आहे. त्यामुळेच तो स्वतः मुस्लिम असूनही मराठा समाजाच्या लढाईत खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे.
माध्यमांशी बोलताना भावूक स्वरात मेहबूब म्हणतो, “गावातील मराठा समाजाने मला आई-वडिलांप्रमाणे आधार दिलाय. माझं हक्काचं म्हणवून घेणारं कुणी नसताना त्यांनी मला पोटभर जेवण दिले. समाजात माणूस म्हणून उभे केले. त्यामुळे त्यांच्यासाठी आज हलगी वाजवणे, हीच माझी खरी सेवा आणि परोपकार आहे.”
आंदोलकांसाठी मोफत आरोग्य शिबीर
मराठा आंदोलकांच्या आरोग्याची काळजी दर्शवत मुंबई एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या वतीने मोफत आरोग्यशिबीर राबवण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तपासणीसह सर्वसामान्य आरोग्य तपासण्या मोफत केल्या गेल्या.
शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टर, नर्सेस व स्वयंसेवक कार्यरत होते. औषधोपचार, तातडीची वैद्यकीय मदत, तसेच गरजू आंदोलनकर्त्यांना जीवनावश्यक गोळ्या आणि सलाईनची सुविधा पुरवण्यात आली. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली.
यावेळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार इम्तियाज जलील यांनी आंदोलकांशी संवाद साधला. एमआयएम पक्ष सदैव सामाजिक न्याय व मागासवर्गीयांच्या हक्कासाठी कार्यरत राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. मराठा समाजाच्या मागण्यांना एमआयएम पक्षाचा ठाम पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
‘मुस्लिम समाज मराठ्यांसाठी छातीचा कोट करुन सर्वात पुढे असेल’
एमआयएम पक्षाने मराठा आंदोलनाला अधिकृतरीत्या पाठींबा दिला आहे. इम्तियाज जलील, वारीस पठाण यांसारख्या अनेक मोठ्या नेत्यांनी मनोज जरांगे यांची आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेतली. यावेळी माजी आमदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला.
इम्तियाज जलील म्हणाले की, “जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं त्या दिवसापासून माझ्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असेदुद्दिन ओवेसी यांनी लोकसभेत हा मुद्दा उचलला .जरांगे पाटलांची आरक्षणाची मागणी ही सरकारने पूर्ण करायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मी जरांगे पाटलांचा मोठा फॅन आहे. मी त्यांच्यासोबत कायम आहे व राहणार.”
ते पुढे म्हणाले की, “मनोज जरांगे यांना एमआयएमचा २००% पाठिंबा आहे. मी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीसांना सांगू इच्छितो की तुम्ही बळजबरी केली, तुम्ही आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जितक्या ताकदीने मराठा समाज रस्त्यावर उतरेल, तितक्याच ताकदीने मुस्लिम समाज छातीचा कोट करून सर्वात पुढे असेल.”
मनोज जरांगेंचा लढा कशासाठी?
मराठा समाजाला इतर मागासवर्ग (OBC) मधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असून, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी सापडतात, त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही (नातेवाईकांना) कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी ते करत आहे. यासाठी हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावे, असे जरांगेंचे म्हणणे आहे.