चवदार तळ्याकाठी सौहार्द जपणाऱ्या रोजा इफ्तारचे आयोजन

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
सर्वधर्मीय इफ्तार कार्यक्रमात उपस्थितांना इफ्तार देताना मुस्लीम बांधव
सर्वधर्मीय इफ्तार कार्यक्रमात उपस्थितांना इफ्तार देताना मुस्लीम बांधव

 

१९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यातील महाड या गावात पाण्यासाठी सत्याग्रह केला. तो 'महाडचा सत्याग्रह' म्हणून ओळखला जाऊ लागला. अस्पृश्य समाजाला पाणी पिण्याचा मुलभूत हक्क मिळवून देणारा हा देशातील पहिला पाण्याचा सत्याग्रह होता. समाजातील रूढी- परंपरांना, अन्याय, विषमता नष्ट करण्यासाठी आणि अस्पृश समाजाला स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी केलेला हा संघर्ष होता. २० मार्च रोजी या घटनेला ९६ वर्षे पूर्ण झाली. 

देशभरातून दलित बहुजन समुदाय या चवदार तळ्याला भेट देण्यासाठी येत असतो. चवदार तळ्याला भेट दिल्यानंतर हा समुदाय येथून क्रांतीची उर्जा घेऊन जातो. त्यामुळे या ठिकाणाला 'क्रांतीभूमी' असेही म्हटले जाते. 

यावर्षीही चवदार तळ्याला भेट देण्यासाठी देशातील प्रत्येक भागातून  मोठा जनसमुदाय आला होता. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे, याच वेळी रमजान महिनाही सुरु आहे. रमजान हा महिना केवळ उपवास आणि साधनेचा नसून सेवेचा व मदतीचा महिना म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे चवदार तळ्याच्या ठिकाणी आलेल्या जनसमुदायाची सेवा करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून पुढाकार घेण्यात आला. 

 
यावर्षी चवदार तळ्याच्या ठिकाणी पहिल्यांदाच रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मूलनिवासी मुस्लिम मंच, संभाजी ब्रिगेड, भीमआर्मी बहुजन एकता मिशन, रीजनल ख्रिश्चन सोसायटी व महाड येथील मुस्लिम समाज बांधव अशा विविधधर्मीय संघटनांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

इफ्तार कार्यक्रम झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते प्रेषित महंमद पैगंबर जयंती पर्यंत एकूण सहा महिने आमचा अभियान सुरू राहणार आहे. महाराष्ट्र 355 तालुके 36 जिल्ह्यात जाऊन सर्व समाज बांधवांमध्ये सलोखा निर्माण करणे तसेच सर्व धर्मीय लोकांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करणे हे पवित्र काम पुण्यातून सुरू करण्यात आले. या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की मौलाना हसरत मोहनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्रित रोजा इफ्तार करीत होते. त्याचीच एक आठवण म्हणून 'अमन का कारवा' अभियान अंतर्गत महाड येथील चवदार तळ्याच्या ठिकाणी रोजा इफ्तारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता."

 
सदर रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अनेक जिल्ह्यातील महिलांचाही मोठा सहभाग होता. मुंबईहून आलेल्या एका 90 वर्षी ज्येष्ठ आजीने रोजा इफ्तरीचे आयोजन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना दुवा दिली. यावेळी डॉ आंबेडकरांच्या मुस्लिम समुदयाशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना उजाळा देण्यात आला. सोबतच मुस्लिम समाज आणि आंबेडकरी समाज एकत्रितपणे बंधुभाव जपत असतो, या दोन्ही समाजातील सहजीवनाचाही उजाळा देण्यात आला. 

 
संपूर्ण देशाने आदर्श घ्यावा असा महाराष्ट्रातील परस्पर सौहार्द जपणारा बंधुभाव वाढविणारा हा कार्यक्रम होता.   

महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकचे प्रमुख जमदाडे, एकता मानव संघटनाचे अध्यक्ष सादिक शेख, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मेहबूब शेख, महाडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलदार पुरकर, हनीफ पुरकर, अनंत कांबळे, मुश्ताक काझी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रोजा इफ्तार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

- सौरभ चंदनशिवे 

([email protected])


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter