जग वेगानं पुढं जात असताना काही लोक आपल्या कृतीतून, संवेदनशीलतेतून आणि दृढ निश्चयातून शांतपणे समाजाचं भविष्य घडवत असतात. सोमवार, २६ मे २०२५ पासून ‘Awaz – The Voice’ वर प्रसिद्ध होणाऱ्या ‘The Changemaker’ लेखमालेतून आम्ही समाज घडवणाऱ्या अशा मुस्लिम व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणार आहोत. या मंडळींनी केवळ स्वतःचंच आयुष्य घडवतलं नाही तर आजूबाजूचा समाजातही बदलत घडवला आहे.
याची सुरुवात होणार आहे देशातील सर्वांत मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशपासून. उत्तर प्रदेशातील हे दहा Changemakers पैकी कुणी पोलिस आहे तर कुणी शास्त्रज्ञ. कुणी खेळात चमक दाखवली आहे तर आघाडीचा सामाजिक कार्यकर्ता आहे. तर अशा विविध क्षेत्रांतील Changemakers आम्ही सोमवारपासून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. त्यांची आणि त्यांच्या कार्याची ही छोटीशी झलक...
१. कॅप्टन सारिया अब्बासी : लष्करात देशसेवा, समाजात प्रेरणा
गोरखपूरमधून आलेल्या कॅप्टन सारिया अब्बासी यांचं बालपणपासूनचं स्वप्न होतं भारतीय लष्करात जाण्याचं. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये B.Tech करूनही त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्यांऐवजी देशसेवेची वाट निवडली. त्यांनी CDS परीक्षा उत्तीर्ण करून चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलं.
आज त्या अरुणाचल प्रदेशात LAC (लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) परिसरात ड्रोन किलर युनिट चालवतात आणि L-70 अॅन्टी एअरक्राफ्ट गनची हाताळणी करतात. पुरुषप्रधान क्षेत्रात त्या आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. स्त्रियाही लष्करात आघाडीवर असू शकतात हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
२. डॉ. फैयाज अहमद फैझी : वंचितांचा बुलंद आवाज
उत्तर प्रदेशातील आयुष डॉक्टर असलेले डॉ. फैझी हे लेखक, भाषांतरकार आणि स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘पसमांदा’ मुस्लिम समाजाच्या समस्यांना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा मुद्दा बनवला. त्यांच्या लेखनात संवेदनशीलता असली तरीही त्यांचा दृष्टिकोन वास्तववादी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील फैझी यांच्या कार्याची दखल घेतली आहे. सामाजिक बदलाच्या लढ्याला शब्दांची धार देणाऱ्या डॉ. फैझी यांचं कार्य एक वैचारिक आंदोलन आहे.
३. मोहम्मद लुकमान अली : खेळ आणि शिक्षणाचा समन्वय
अमरोहाचा मोहम्मद लुकमान अली जामिया मिलिया इस्लामिया येथे सामाजिक कार्यात मास्टर्स करत आहे. मात्र सोबतच तो कुस्तीमध्ये राष्ट्रीय पातळीवर नाव कमवत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरी जन्मलेले लुकमानला त्याच्या आईने शिस्त, मूल्यं आणि शिक्षणाचं महत्त्व समजावलं.
खेळ आणि शिक्षण यांच्या समन्वयातून यशाचं शिखर गाठता येतं हा संदेश मोहम्मद लुकमान अलीची कहाणी आपल्याला देते.
४. रुबिना रशीद अली : अलिगढच्या गल्लीतील कलात्मकतेला आर्थिक बळ
रुबिना अली यांनी अलिगढमधील पारंपरिक अॅप्लिक वर्कला (कापडावर केलेली काटेकोर शिवण) आधुनिक अर्थव्यवस्थेशी जोडून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवलं. पूर्वी मध्यस्थांमुळे महिलांना त्यांच्या कौशल्याचा योग्य मोबदले मिळत नसे. पण रूबिनाच्या प्रयत्नांमुळे शेकडो महिलांना थेट विक्री करता येऊ लागली आणि योग्य मोबदला मिळायला लागला.
रुबिनाचा उपक्रम केवळ एक शिलाई प्रकल्प नाही, तर एका समूहानं आपली कला टिकवून ठेवत स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.
५. बब्बन मियाँ : बुलंदशहरमध्ये गायींची सेवा आणि सामाजिक सलोखा
बब्बन मियाँ यांनी आपल्या आई हामिदुन्निसा बेगम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'मधु सदन गोशाळा' सुरू केली. बुलंदशहरमध्ये गेली पाच दशके त्यांचं कुटुंब गायींची सेवा करत आहे. या गोशाळेत विविध जातीच्या गायींची काळजी घेतली जाते.
त्यांचे कार्य धार्मिक सीमां ओलांडणारे असून, मानवतेच्या नात्याने सर्व जीवांची सेवा हेच त्यांचं तत्व आहे. त्यातून सामाजिक ऐक्यालाही बळ मिळालं आहे.
६. खुशबू मिर्झा : प्रवास अमरोहापासून अंतराळापर्यंतचा
ISRO च्या 'चंद्रयान-१' आणि 'चंद्रयान-२' मोहिमांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या खुशबू मिर्झा यांचा जन्म अमरोहात झाला. त्यांचे वडील लहानपणीच गेल्यामुळे त्यांचं पालनपोषण आईने केलं. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये सुवर्णपदकासह पदवी घेतली.
गब्बर पगाराच्या कॉर्पोरेट नोकऱ्यांना नकार देऊन त्यांनी ISRO मध्ये काम करण्याचं ठरवलं. आज त्या देशातील प्रमुख वैज्ञानिकांपैकी एक आहे. महिलांसाठी विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुण मुलींसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
७. जहीर फारूकी : पुरकाझीचे परिवर्तनशील नेतृत्व
मुजफ्फरनगर जिल्ह्यातील पुरकाझी नगर पंचायतीचे अध्यक्ष जहीर फारूकी यांनी आपली १.५ कोटींची जमिन तालुक्यातील पहिल्या इंटरमिजिएट कॉलेजसाठी दिली. त्यामुळे आता गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर जावं लागत नाही.
त्यांच्या काळात 'PM SHRI' योजनेमधून गावातील शाळांमध्ये मोठ्या सुधारणा झाल्या. गावात देशातील पहिली दुमजली सरकारी गोशाळा उभी राहिली. फारुकी यांचं नेतृत्व विकास, सुरक्षितता आणि सलोखा यांचं प्रतीक आहे.
८. डॉ. फरहा उस्मानी : जागतिक आरोग्य धोरणांची शिल्पकार
अलिगढमध्ये जन्मलेल्या डॉ. फरहा उस्मानी यांनी एमडी (स्त्रीरोग व प्रसूती) केल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसिनमधून पुढील शिक्षण घेतलं. आज त्या UNFPA (United Nations Population Fund) मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
SAFAR या संस्थेमार्फत त्यांनी भारतातील वंचित महिलांच्या आरोग्य, अधिकार, आणि सुरक्षिततेसाठी मोठं काम केलं आहे. शिक्षण आणि चिकाटीच्या जोरावर जागतिक धोरणनिर्मितीत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या फरहा यांची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
९. अंजुम आरा : विश्वासाचा पूल आणि परिवर्तनाचा वसा
२०१२ बॅचच्या आयपीएस अधिकारी अंजुम आरा यांचा जन्म आझमगढमध्ये झाला. इंटिग्रल युनिव्हर्सिटी, लखनऊ येथून कॉम्प्युटर इंजिनियरिंग केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट करिअर ऐवजी भारतीय पोलीस सेवेस प्राधान्य दिलं. शिमल्यात वरिष्ठ पोलीस अधीक्षक पदावर काम करताना त्यांनी कायद्याचा आदर राखत, पोलिसी व्यवस्था लोकाभिमुख करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. आपल्या संवेदनशील दृष्टिकोनातून त्यांनी समाजात पोलिसांबद्दलचा विश्वास दृढ केला आहे.
अंजुम यांचा विवाह युनुस खान या IAS अधिकाऱ्याशी झालाय. दोघांनी मिळून शहिद नायब सुभेदार परमजीत सिंग यांच्या कन्या खुशदीपच्या शिक्षणाचा खर्च उचललाय. केवळ सहानुभूती देऊन ते थांबले नाहीत तर कर्तव्यभावनेने त्यांनी कृतीही केली आहे. अंजुम आरा मुलींच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्याने काम करत आहेत.
१०. मुमताज खान : हॉकीच्या मैदानातून आशेचा खेळ
लखनौच्या कॅन्ट भागातील एकाच खोलीत आठ भावंडांसह वाढलेल्या मुमताज खान यांनी वडिलांच्या भाजीपाला स्टॉलवर हातभार लावत लहानपण घालवलं. शालेय स्पर्धेत धावण्याच्या वेळी त्यांच्या क्रीडाप्रतिभेची पहिल्यांदा दखल घेतली गेली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि थेट भारतीय महिला हॉकीच्या कनिष्ठ संघात प्रवेश मिळवला.
२०१८ च्या युथ ऑलिंपिकमध्ये त्यांनी १० गोल करत भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. असुंता लाक्रा पुरस्कारासह इतर अनेक सन्मान त्यांना मिळाले असून त्यांचं स्वप्न ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्याचं आहे. गरिबीतून पुढं आलेल्या मुमताज यांची ही कथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
उत्तर प्रदेशातील हे दहा चेंजमेकर सामाजिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाचे प्रतिनिधी आहेत. बदलाची सुरुवात एका व्यक्तीपासूनही होऊ शकते, असा संदेश या दहाही व्यक्ती आपल्या कार्यातून देत आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या ‘The Changemaker’ सिरीजमधून जाणून घेऊया या प्रेरणादायी व्यक्तींमत्वांना आणि त्यांच्या याशोगाथांना!