दिलावर खान, हुमायूं भट, अब्दुल लतीफ यांचा शौर्य पुरस्काराने सन्मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
 राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून कीर्ती चक्र स्वीकारताना  नायक दिलवर खानची पत्नी आणि आई
राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून कीर्ती चक्र स्वीकारताना नायक दिलवर खानची पत्नी आणि आई

 

देशाप्रती कर्तव्य बजावताना असाधारण शौर्य, समर्पण आणि बलिदान दाखवणाऱ्या शूर वीरांना दरवर्षी कीर्ती चक्र आणि शौर्य पुरस्कार देण्यात येतात.  कीर्ती चक्र हा भारताचा दुसरा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे. नुकतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना काश्मीर आणि मणिपूरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये दाखवलेल्या अतुलनीय धैर्य आणि शौर्यासाठी कीर्ती चक्र प्रदान केले.  यावेळी सहा कीर्ती चक्र आणि ३३ शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. यापैकी चार कीर्ती चक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आले.  

या पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये लष्कराचे पाच कर्मचारी आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपअधीक्षक (डीएसपी) हूमायूं मुजम्मिल भट यांचा समावेश आहे. कर्नल मनप्रीत सिंह आणि हूमायूं  मुजम्मिल भट यांना सप्टेंबर २०२३ मध्ये दक्षिण काश्मीरमधील अनंतनागच्या जंगलात पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईतील शौर्यासाठी मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. 

हूमायूं भट यांना मरणोत्तर कीर्ती चक्र 
सप्टेंबर २०२३ मध्ये अनंतनागच्या गडोळ परिसरात दहशतवाद्यांविरुद्ध ‘सर्च अँड डिस्ट्रॉय’ ऑपरेशन दरम्यान कर्नल मनप्रीत सिंह यांनी १९ राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. तर डीएसपी हूमायूं  भट यांनी विशेष ऑपरेशन गटाचे (SOG) नेतृत्व केले होते. हूमायूं मुजम्मिल भट यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी सामना केला. स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला. गंभीर जखमांनंतरही त्यांनी गोळीबार सुरू ठेवला आणि दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखले होते.
 
शहीद हूमायूं मुजम्मिल भट यांच्या पत्नी फातिमा आणि कर्नल मनप्रीत सिंह यांच्या पत्नी आणि आई यांनी राष्ट्रपतींकडून कीर्ती चक्र स्वीकारले. हे कीर्ती चक्र देतानाचे फोटो राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत ‘X’वर प्रकाशित केले आहेत. 
 
नायक दिलावर खान मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नायक दिलावर खान (रेजिमेंट ऑफ आर्टिलरी, 28 राष्ट्रीय रायफल्स) यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान केले. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब खोऱ्याच्या दाट जंगलात घात ऑपरेशनदरम्यान त्यांच्या पथकाने दोन दहशतवाद्यांना पाहिले होते. २३ जुलै २०२४ च्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नाईक दिलावार खान यांच्या पथकाला दोन दहशतवादी दिसले होते. त्यापैकी एक दहशतवादी अगदी जवळ होता. दहशतवाद्याकडून गंभीर धोका जाणवू लागल्याने नायक दिलावर खान यांनी जोरदार गोळीबार करूनही दहशतवाद्याला पकडले होते. दुसरा दहशतवादी दुरूनच अंदाधुंद गोळीबार करत होता. या धाडसादरम्यान नायक दिलावर खान गंभीर जखमी झाले. जखमी असूनही त्यांनी दहशतवादाल्या सोडले नाही आणि गोळीबार करून दहशतवाद्याला कंठस्नान घातले.

अब्दुल लतीफ शौर्य चक्रने सन्मानित 
जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष पोलीस अधिकारी (SPO) अब्दुल लतीफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य चक्र प्रदान केले.  दहशतवादी हल्ल्याविरुद्ध दाखवलेल्या असाधारण शौर्य आणि समर्पणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 
अब्दुल लतीफ यांच्या घरी दोन दहशतवादी घुसले होते. या दहशतवाद्यांनी त्यांना जेवण आणि फोनची मागणी केली होती.  जेवण तयार करण्यास विलंब होत असल्याचे कारण सांगून लतीफ यांनी हुशारीने बाहेर येऊन सुरक्षा दलांना दहशतवाद्यांची माहिती दिली. काही वेळातच सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला. यावेळी अब्दुल लतीफ यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या चकमकीत दहशतवादी ठार झाले

याशिवाय मेजर मल्ला रामा गोपाल नायडू (मराठा लाइट इन्फंट्री, ५६ राष्ट्रीय रायफल्स) आणि मेजर मंजीत (पंजाब रेजिमेंट, 22 राष्ट्रीय रायफल्स) यांना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. तसेच रायफलमन रवि कुमार (जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्री, 63 राष्ट्रीय रायफल्स), कर्नल मनप्रीत सिंह (सिख लाइट इन्फंट्री, 19 राष्ट्रीय रायफल्स), यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. हुमायूं यांच्यासोबत मेजर आशिष धोंचक आणि सेपॉय प्रदीप सिंह यांनीही बलिदान दिले होते. त्यांनादेखील राष्ट्रपतींनी मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान केले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter