भारत अण्वस्त्रांच्या धमकीला बळी पडणार नाही - परराष्ट्रमंत्री जयशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी जर्मनीत दहशतवादाविरुद्ध भारताच्या ‘शून्य सहिष्णुता’ (Zero Tolerance) धोरणावर भाष्य करताना म्हटले, “भारत कधीही अण्वस्त्रांच्या धमकीला (Nuclear Blackmail) बळी पडणार नाही आणि पाकिस्तानशी केवळ द्विपक्षीय पातळीवरच (Bilaterally) व्यवहार करेल.” जर्मनीचे परराष्ट्रमंत्री योहान वाडेफुल यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर यांनी हे वक्तव्य केले. यावेळी जर्मनीने २२ एप्रिल २०२५ च्या पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला. 

“पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने कारवाई केल्यानंतर मी बर्लिनला आलो आहे. भारताचा दहशतवादाविरुद्ध ‘शून्य सहिष्णुता’ धोरण आहे. भारत अण्वस्त्रांच्या धमकीला कधीच बळी पडणार नाही आणि पाकिस्तानशी केवळ द्विपक्षीय पातळीवरच व्यवहार करेल. याबाबत कोणत्याही स्तरावर गोंधळ असता कामा नये. प्रत्येक राष्ट्राला दहशतवादाविरुद्ध स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, याबाबत जर्मनीच्या समजुतीचे आम्ही कौतुक करतो,” असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

दोन्ही मंत्र्यांनी या भेटीदरम्यान भारत आणि जर्मनीमधील सामरिक भागीदारीला ‘अधिक मजबूत, खोल आणि जवळीक आणण्याबरोबरच पुढील वचन आणि संभावना’ असलेल्या क्षेत्रांवर चर्चा केली.

जर्मन परराष्ट्रमंत्री वाडेफुल यांनी सांगितले, “२२ एप्रिल रोजी भारतावर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने आम्ही सर्वजण स्तब्ध झालो. आम्ही या नागरिकांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. सर्व बळी आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आमची खोल सहानुभूती आहे. दोन्ही बाजूंनी लष्करी हल्ल्यांनंतर, भारताला दहशतवादाविरुद्ध स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. सध्या युद्धविराम लागू झाल्याचे आम्ही खूप कौतुक करतो.”

जयशंकर यांचा तीन देशांचा दौरा
जर्मनी हा जयशंकर यांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा आहे. हा दौरा १९ मे रोजी नेदरलँड्सच्या भेटीने सुरू झाला होता. त्यानंतर त्यांनी डेन्मार्कला अधिकृत भेट दिली आणि नंतर जर्मनीत पोहोचले. या दौऱ्यादरम्यान, जयशंकर यांनी या देशांच्या शीर्ष नेत्यांशी भेटी घेतल्या आणि त्यांच्या समकक्ष परराष्ट्रमंत्र्यांसोबत द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक आणि जागतिक परस्पर हिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
 'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter