संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी शुक्रवारी सांगितले की, गाझातील पॅलेस्टिनी लोक युद्धाच्या सर्वात क्रूर टप्प्यातून जात आहेत. इस्रायलने मानवीय मदतीला परवानगी द्यावी आणि सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
गाझात दिलासा
इस्रायलने बर्याच काळानंतर थोडीशी सवलत देत अन्न आणि आवश्यक वस्तूंच्या ट्रकांना गाझात प्रवेश देण्याची परवानगी दिली. परंतु यावेळी भुकेने व्याकूळ झालेल्या लोकांनी हे ट्रक लुटले. गाझाच्या नागरी संरक्षण यंत्रणेचे अधिकारी मोहम्मद अल-मुघैय्यिर यांनी सांगितले की, शुक्रवारी इस्रायली हवाई हल्ल्यात किमान ७१ जणांचा मृत्यू झाला. डझनभर लोक जखमी झाले तर, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
गाझात मदत अत्यल्प
गुटेरेस म्हणाले, “गाझात खूपच कमी मदत पोहोचत आहे. गरज प्रचंड आहे. ही तर चमचाभर मदत आहे, इथे तर मदतीचा पूर हवा.” मागील काही दिवसांत ४०० ट्रकांना गाझात पाठवण्याची परवानगी मिळाली, पण फक्त ११५ ट्रक पोहोचले, असे त्यांनी सांगितले.
परिस्थिती बिकट
जागतिक अन्न कार्यक्रमाने (डब्ल्यूएफपी) सांगितले की, गुरुवारी रात्री दक्षिण गाझात त्यांचे १५ ट्रक लुटले गेले. भूक, भीती आणि अनिश्चिततेमुळे परिस्थिती आणखी चिघळत आहे, असे संघटनेने नमूद केले. इस्रायली अधिकाऱ्यांनी जास्त आणि जलद मदत पाठवावी, अशी विनंती त्यांनी केली. २ मार्चनंतर प्रथमच सोमवारी गाझात पुन्हा मदत पाठवणे सुरू झाले. इस्रायली नाकेबंदीमुळे तिथे अन्न आणि औषधांची प्रचंड टंचाई झाली होती.
इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या सिव्हिल युनिट COGAT ने सांगितले की, गुरुवारी १०७ ट्रक गाझात दाखल झाले. युनाइटेड नेशन्सच्या UNRWA चे प्रमुख फिलिप लझारिनी यांनी सांगितले की, युद्धविरामादरम्यान युनाइटेड नेशन्स रोज ५०० ते ६०० ट्रक पाठवत होते. लझारिनी यांनी सोशल मीडियावर लिहिले, “गाझातील लोक ११ आठवड्यांपासून भुकेले आहेत. आता मदत लुटली जात आहे, यात आश्चर्य वाटायला नको.”