पहलगाम येथे २५ पर्यटक आणि एका स्थानिक घोडेवाल्याच्या हत्येला एक महिना उलटला. या घटनेने काश्मीरमधील पर्यटकांचा ओघ तात्पुरता थांबवला होता. आता मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेला पर्यटकांचा सामान्य प्रवाह पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्र आणि जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश सरकार तसेच पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येऊन काश्मीरमधील सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरणात पर्यटकांचा विश्वास जागवण्यात यश मिळवले आहे.
प्रथमच मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी १५ मे रोजी प्रमुख पर्यटन व्यावसायिकांशी बैठक घेतली. त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पहलगामच्या घटनेनंतर काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रासाठी पुढील मार्गावर चर्चा झाली. त्यांनी सर्वसमावेशक आणि विचारपूर्वक पर्यटन पुनरुज्जन योजना तयार करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यावसायिकांशी चर्चा करताना त्यांना काही गोष्टी सुचवल्या. त्यांनी सांगितले की, “ही योजना घाई न करता, विचारपूर्वक तयार करावी आणि अंतिम करावी. हॉटेल, हाउसबोट, शिकारा, टॅक्सी, हस्तकला यांना या योजनेतून आधार मिळावा. तसेच यंदाच्या अमरनाथ यात्रेनंतर पर्यटन विभागासोबत मिळून मजबूत पुनरुज्जन धोरण तयार करावे. दुबईच्या धर्तीवर अनोखा खरेदी महोत्सवासारखे नाविन्यपूर्ण मॉडेल शोधावेत. असेही त्यांनी नमूद केले.
व्हल एजंट्स असोसिएशन ऑफ काश्मीरचे (टीएएके) माजी अध्यक्ष पीरजादा फैयाज अहमद यांनी ‘आवाज द व्हॉईस’ला सांगितले, “पहलगामच्या घटनेनंतर काश्मीरच्या पर्यटनाची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. पंतप्रधानांनी काश्मीरसाठी मोहीम राबवण्याचे आश्वासन दिल्याने काही प्रश्न निर्माण झाले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यावर आक्रमक आणि सकारात्मक पावले उचलत आहेत. तसेच काही राष्ट्रीय पातळीवरील संघटना काश्मीरच्या प्रसारासाठी पुढे आल्या आहेत." असेही ते म्हणाले.
भारत आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या पाठबळाने पर्यटन पुन्हा बहरेल आणि मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरला भेट देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. “पर्यटन हा आमच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे सकल देशांतर्गत उत्पादनात मोठा वाटा उभा राहतो. पहलगामच्या घटनेमुळे हंगामाच्या मध्यात या क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले. व्यावसायिकांना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणले,” असे पीरजादा फैयाज यांनी सांगितले.
व्यावसायिकांना या कठिण काळात सरकारकडून आर्थिक पॅकेजची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर युद्धविरामानंतर ७ ते १२ मे दरम्यान बंद असलेल्या हवाई सेवांनंतर टॅक्सी चालकांना पुन्हा सेवा सुरू झाल्याने आशेचा किरण दिसला.
विमानतळावरील टॅक्सी स्टँड ड्रायव्हर्स युनियनचे अध्यक्ष मोहम्मद अशरफ लोन यांनी ‘आवाज द व्हॉईस’ला सांगितले, “सध्या विमानतळावर १०० पेक्षा कमी पर्यटक येतात. गेल्या काही दिवसांत ही संख्या ३० वरून ५० झाली. पहलगामच्या घटनेपूर्वी रोज सुमारे १२,००० पर्यटक येत आणि जात होते, त्याच्या तुलनेत ही संख्या जवळपास शून्य आहे."
त्यांनी पुढे नमूद केले की, "गेल्या काही दिवसांपासून आधीच बुकिंग केलेले पर्यटक व्यक्तिगत किंवा समूहाने येऊ लागले आहेत. बुधवारी पर्यटकांच्या समूहांना घेण्यासाठी चार मोठी वाहने (प्रत्येकी १२ पेक्षा जास्त आसनक्षमता) विमानतळावर आली."
विमानतळाच्या टॅक्सी स्टँडवरून २३४ टॅक्सींचा ताफा चालतो. या टॅक्सी पर्यटकांना श्रीनगरमधील दल तलाव, गुलमर्ग, पहलगाम आणि सोनमर्गसह काश्मीरच्या सर्व पर्यटनस्थळांवर घेऊन जातात. पहलगामच्या घटनेनंतर काही दिवसांनी, सुरक्षा कारणांसाठी जम्मू-काश्मीर सरकारने ८९ पैकी ४८ पर्यटनस्थळे बंद केली. यामुळे पर्यटकांचा ओघ थांबला, असे मोहम्मद अशरफ लोन यांनी सांगितले.
टॅक्सी युनियनने पर्यटन विभागाशी बैठक घेतली. त्यात चालकांच्या आर्थिक अडचणींवर चर्चा करण्यात आली. वाहन कर्जाचे हप्ते आणि विमानतळ प्राधिकरणाला दरमहा १२ लाखांहून अधिक रक्कम देण्याचे प्रश्न तिथे त्यांनी मांडण्यात आले.
'काश्मीरमध्ये आपले स्वागत'
पहलगामच्या हत्याकांडानंतर, ४८ पर्यटनस्थळे बंद करण्याच्या सल्ल्यामुळे आणि ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामुळे विमानसेवा बंद झाल्या. यानंतर मोठ्या संख्येने पर्यटकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांतर्गत रविवारी रोड शो आयोजित करण्यात आला होता.
रविवारी सुमारे ३०० वाहनांचा ताफा 'काश्मीरमध्ये आपले स्वागत' असे बॅनर फडकवत दल तलावापासून पहलगामकडे रवाना झाला. पर्यटन व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, वाहतूकदार यांनी पर्यटकांना काश्मीरमध्ये पुन्हा आमंत्रित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला.
हॉटेल रिकामी, मार्गदर्शक बेरोजगार आणि शिकारा सवारी बंद असल्याने 'काश्मीर सुरक्षित आहे' हा संदेश संपूर्ण देशात पोहोचवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला.