काल भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानच्या दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी गेल्या काही दशकांपासून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांचा अनुभव भारताला येत असल्याचे सांगितले. यामध्ये २००८ च्या 26/11 मुंबई हल्ल्यापासून ते गेल्या महिन्यात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा समावेश आहे.
भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वथानेनी हरीश यांनी UNSC च्या खुल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला. ही चर्चा ‘सशस्त्र संघर्षात नागरिकांचे संरक्षण’ या विषयांतर्गत ‘उदयोन्मुख धोके हाताळणे, नागरिक, मानवतावादी आणि UN कर्मचारी, पत्रकार आणि मीडिया व्यावसायिक यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि जबाबदारी यंत्रणा मजबूत करणे’ या थीमवर आयोजित करण्यात आली होती.
या चर्चेत हरीश यांनी सांगितले की, “पाकिस्तानच्या प्रतिनिधीने अनेक मुद्द्यांवर केलेल्या निराधार आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी मला बोलावे लागत आहे. भारताने गेल्या काही दशकांपासून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. यामध्ये २००८ च्या मुंबईवरील 26/11 च्या भयंकर हल्ल्यापासून ते एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांच्या क्रूर सामूहिक हत्येपर्यंतच्या घटना समाविष्ट आहेत.”
पुढे ते म्हणाले, “पाकिस्तानी दहशतवादाचे बळी प्रामुख्याने सामान्य नागरिक ठरले आहेत. कारण त्यांचा हेतू आमच्या समृद्धी, प्रगती आणि मनोबलाला धक्का लावण्याचा आहे. अशा राष्ट्राने नागरिकांच्या संरक्षणावरील चर्चेत भाग घेणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाचा अपमान आहे.”
26/11 च्या मुंबई हल्ल्यात १६६६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा हात होता. तसेच, पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित गटाने घेतली होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यामध्ये नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. या कारवाईनंतर भारताने संयुक्त राष्ट्रांसह विविध जागतिक मंचांवर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा मुद्दा उपस्थित केला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter