उत्तरप्रदेशातील हे मुस्लीम बहुल गाव बनलंय शांती आणि सौहार्दाचे प्रतीक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 7 Months ago
हैबतपूर गावातील रहिवासी
हैबतपूर गावातील रहिवासी

 

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील गडमुक्तेश्वरजवळ एक रमणीय गाव आहे. गंगेच्या काठापासून जवळपास ४० किलोमीटरवर वसलेले हे गाव म्हणजे हैबतपूर. या गावात 'पठाण' या समुदायातील मुस्लिम लोक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. 'जिथे मुस्लिम धर्माचे लोक राहतात तिथे गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असते...तिथे दंगली घडतात,' असा आपल्याकडे एक गैरसमज आहे. मात्र, धर्मानुसार विभागणी करणाऱ्या अशा प्रवृत्तींना  सणसणीत चपराक लगावण्याचे काम हे गाव करत आहे. शतकानुशतकांपासून शांततापूर्ण आणि समृद्ध जीवन जगणारे गाव म्हणून हैबतपूर या मुस्लिमबहुल गावाकड पाहिले जाते. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तिथे आजपर्यंत एकही 'एफआयआर' दाखल झालेली नाही. जाणून घेऊ या सलोख्याच्या या गावाविषयी.   

'राष्ट्रीय महामार्ग २४' पासून अवघ्या काही मीटरवर हैबतपूर हे गाव आहे. गावाच्या वाटेवर हिरवीगार आणि रसाळ उसाची शेते आहेत. गावाच्या सीमेत आल्यावर शेतातील शेणखताचा आणि जंगली झाडांचा वास हवेत दरवळत असलेला जाणवतो. 
 

परिसरात मुक्तपणे आणि निर्भयपणे चरणारी गुरे, शेळ्या अशी पाळीव जनावरे पाहून आपण खेडेगावात आलो असल्याची सुखद जाणीव मनाला होते. शाळेचा गणवेश घालून पाठीला दप्तर अडकवून मुली सायकलीवरून शाळेच्या दिशेने जाताना दिसतात. गेल्या काही वर्षांत इथले रस्ते आणि घरे पक्की झाली आहेत. या परिसरातील हवा अजूनही शुद्ध आहे. याच हवेत १०६ वर्षीय अलाउद्दीन खान दीर्घायुष्य जगत आहेत. 

अल्लाउद्दीन यांच्या डोक्यावर नेहमी टोपी असते. लांब दाढी राखायला त्यांना आवडते. वयोमानानुसार त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसपणा मात्र शाबूत आहे. त्यांचा गावात सर्वत्र संचार असतो. गावात असे हिंडताना-फिरताना हातातल्या काठीचा आधार त्यांना पुरेसा असतो. 

आपल्या सुदृढ प्रकृतीबद्दल अल्लाउद्दीन कौतुकाने सांगतात, “नमाज अदा करण्यासाठी माझ्या घरापासून गावातील मशिदीपर्यंत दिवसातून पाच वेळा सुमारे एक किलोमीटर अंतर मी चालत जातो.” 

 
गावातील लोक आनंदाने जीवन जगत आहेत. जवळपासच्या गावातील हिंदू जाट समाजाच्या लोकांशी या गावकऱ्यांचे चांगला ताळमेळ आहे. अलाउद्दीन सांगतात, "आम्हाला आमच्या परंपरेचा अभिमान आहेच; मात्र, दुसऱ्या धर्माच्याही रूढी-परंपरांचा आम्ही आदर करतो. आजूबाजूला राहणारे हिंदू धर्माचे लोक मोठ्या संख्येने आमच्या गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. जाट वस्ती असलेल्या आजूबाजूच्या ५० गावांमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमच्याशीही ते लोक फार सौजन्याने वागतात. त्यामुळेच इथे हिंदू आणि मुस्लिम या समुदायांमध्ये कधीही संघर्ष झालेला नाही." 

ते पुढे सांगतात, "आमचे त्या लोकांशी जाती-धर्माच्या पलीकडचे घट्ट नाते आहे. याचे उदाहरण म्हणजे, गावातील एका अरुंद रस्त्याच्या चौकात हिंदू-मुस्लिम गावकऱ्यांचा एक जुना ग्रुप रोज संध्याकाळी एकत्र जमतो. हातात खडे आणि दगड घेऊन ते खेळत असतात. या खेळाला आमच्याकडे 'बागीबाग' असं म्हणतात." 

लोककथेनुसार इथले ग्रामस्थ सांगतात, "खूप पूर्वी भारतात आलेले पाच पठाणबांधव या गावात राहत होते. पुढे या पाच भावांनी आपल्या हिंदू-मुस्लिम मित्रांनाही गावात स्थायिक होण्यासाठी बोलावले. पठाणांचे हे गाव पूर्वीपासूनच जाटबहुल वस्तीचे आहे." 

 
गावात जाहिद खान म्हणून एक प्रतिष्ठित शेतकरी आहेत. आता ते सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जगत आहेत. त्यांची मुले आता शेती काम पाहतात. ७५ वर्षीय खान मोठ्या समाधानाने सांगतात, “आम्ही कष्टाळू लोक आहोत. ग्रामीण जीवनाचा पुरेपूर आनंद घेतो. गावातील बहुतेक लोक एकमेकांचे नातेवाईक आहेत. गावातील सुमारे १५०० मतदार हे पाच पठाण पूर्वजांचे वंशज आहेत. समाजातील आंतरविवाहामुळे ही कुटुंबे निर्माण झाली आहेत. गावातील बहुतांश पुरुष शेतकरी आहेत. त्यांची स्वतःची शेती आहे, तर गावातील तरुण पिढी आता अन्य व्यवसायांत अधिक रस घेताना दिसते."  

तरुण व्यावसायिक असीम खान सांगतात, “झोयामध्ये (जिल्हा : अमरोहा) माझा एक बँक्वेट हॉल आहे, तसेच मी तीन वीटभट्ट्याही चालवतो. अल्लाहची आमच्यावर कृपा आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू आहे.” असीम यांना दोन मुली आहेत. या मुलींना उच्च शिक्षण देण्याचे असीम यांचे स्वप्न आहे. 

या गावातील महिला शिक्षणाबद्दल अतिशय जागरूक आहेत. ९६ वर्षीय बानो बेगम गावातील सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. आपल्या तरुणपणी बानो यांनी सरपंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा दबदबा आजही कायम आहे. मुलींच्या शिक्षणावर दृढ विश्वास असलेल्या बानो प्रत्येक मुलीला शिक्षणाची प्रेरणा देतात. त्या नेहमी लहान मुलींच्या घोळक्यात दिसतात. 

 
बानो बेगम यांची नातेवाईक शाजिया सांगते, “आमचे गाव खूप भाग्यवान आहे. येथे विविध गावांतील अनेक मुली व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत आहेत. त्यांच्यापैकी काहीचे शिक्षण पूर्ण झाले असून त्या आता कपड्यांचा व्यवसाय करतात.” 
 
बानो यांची भाची रुश्दा जवळच्या खासगी संस्थेतून बी. फार्मचा डिप्लोमा करत आहे. स्वप्नाळू  रुश्दा सांगते, “शिक्षण पूर्ण करून मी पुढे गावात केमिस्टचे दुकान सुरू करणार आहे.” रुश्दा हिच्या वडिलांनी लष्करात अनेक वर्षे सेवा बजावली आहे. ते लष्करात होते त्यामुळे त्यांना 'फौजी खान' असे संबोधले जाते. ते सध्या शेतीत रमले आहेत. परिसरातील लोक त्यांच्याकडे आदराने आणि सद्भावनेने पाहतात. 

विकासाच्या दृष्टीने फौजी खान सांगतात, “गेल्या सात वर्षांत या प्रदेशाचा उल्लेखनीय विकास झाला आहे. चांगले रस्ते आणि महामार्ग यांच्यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी झाली आहे. गावातील लोकांना सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळतो." ते पुढे सांगतात, “आमच्या गावात  इतके शांततेचे वातावरण आहे की कुणालाही पोलिसांत 'एफआयआर' नोंदवण्याची आजपर्यंत कधी गरजच पडली नाही. आमचे छोटे-मोठे वाद आम्ही स्थानिक पातळीवरच मिटवतो." 
 
 
या गावातील तरुणांना खेळाची प्रचंड आवड आहे. यांपैकीच एक इब्राहीम खान सांगतो, “कुस्तीमुळे माझे शरीर आणि मन तंदुरुस्त राहते. कुस्तीमुळे मला आत्मविश्वास मिळतो." गावातील इतर तरुण पैलवानांबरोबर इब्राहीम रोज तासन् तास कुस्तीचा सराव करतो. गावकऱी होता होईल तितके घरच्या जेवणाला प्राधान्य देत असतात. तंदुरुस्तीसाठी बाहेरचे काही 'पौष्टिक' वगैरे खाण्याकडे इथल्या गावकऱ्यांचा कल नाही. घरी तयार केलेले कैरीचे लोणचे इथल्या गावकऱ्यांच्या खूप आवडीचे आहे. 
 
समृद्ध खेडेगावातील या तरुणांमध्ये देशसेवेची एक वेगळीच जिद्द आहे. त्यामुळे गावातील अनेक तरुण लष्करात दाखल झालेले आहेत. याविषयी आबाद खान सांगतात, “मी 'मानविकी'मध्ये (म्हणजे साधारणतः नैसर्गिक-सामाजिक-सांस्कृतिक-ऐतिहासिक अशा विविध बाजूंनी केले जाणारे मानवी वर्तनव्यवहाराचे विश्लेषणशास्त्र) माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. आता मी लष्करात भरती होण्याच्या प्रयत्नात आहे. ते माझे स्वप्न आहे. देशसेवेची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असेल."

या गावाची भेट मनाला टवटवीत करते. मनाला भारावून टाकते. सांप्रदायिक ध्रुवीकरणाचे वातावरण आज आपण अनेक ठिकाणी पाहतो. हैबतपूरने मात्र या वातावरणापासून स्वतःला दूर ठेवल्याचे दिसून येते. सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी येथील लोक साधे, निरोगी आणि शांततापूर्ण जीवन जगताना आढळतात. असे जीवन जगण्याचा ते पुरेपूर आनंद घेतात...

- आतीर खान, संपादक, आवाज द व्हाईस 

(अनुवाद : छाया काविरे)