पिंपरी बुद्रुकच्या पीरसाहेब उरूसाला सुरुवात

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 30 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक गावचे ग्रामदैवत उदगीरबाबा (पीरसाहेब) यांचा उरूस १ एप्रिल ते ३ एप्रिल दरम्यान होणार आहे. मुख्य उरसासह तमाशा आणि राज्यातील नामांकित मल्लांच्या कुस्त्यांच्या मुकाबल्याने यात्रेची सांगता होणार आहे.

इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणारे उदगीरबाबा (पीरसाहेब) यांचा दरवर्षीप्रमाणे नियम परंपरेप्रमाणे उरूस होणार आहे. त्यामध्ये सोमवारी मानाच्या संदलच्या मिरवणुकीने बाबांच्या मजारवर संदल चढवण्यात येणार आहे. २ एप्रिलला मुख्य उरसानिमित्त विविध स्टॉल्ससह साहित्य विक्रीची दुकाने यात्रेमध्ये लावली जातात. सायंकाळी नऊ वाजता मानाच्या घोड्याची मिरवणूक (छबीना) काढण्यात येतो. त्यानंतर प्रकाश अहिरेकरसह नीलेशकुमार अहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे.

३ एप्रिल रोजी पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित मल्लांच्या कुस्तीने यात्रेची सांगता होणार आहे. गावाच्या परंपरेप्रमाणे पीरसाहेब यात्रेसाठी लोकवर्गणी गोळा करण्यात येते. त्यातून पीरसाहेबांच्या दर्याची रंगरंगोटी, गलप (मजारवरील कापड), तमाशा, कुस्त्यांसाठी त्याचा खर्च करण्यात येत असतो. तसेच गावातील इतर यात्राही त्यातून पार पाडण्यात येतात.

परंपरेप्रमाणे पीरसाहेब यात्रेनिमित्त माहेरवाशिणी संपूर्ण कुटुंबीयांसह नवस फेडण्यासाठी तसेच पीरसाहेबांना नैवेद्य, नारळ फोडण्यासाठी येतात. पंचक्रोशीत सर्व जाती धर्माचे भाविकही मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.