यावेळीस आशिया कप २०२३ चे आयोजन पाकिस्तानसह श्रीलंकेत होत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीचे काही सामने पावसामुळे खराब झाले. लीग टप्प्यानंतर कोलंबोत सुपर ४ चे सामने खेळवल्या जाणार आहेत. येथे संततधार पावसामुळे सामने हलविण्याची चर्चा सूरू होती. पाकनेही सामने पाकिस्तान मध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण ACC ने आता सामन्याचे ठिकाण न बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथे पूरसदृश स्थिती दिसून येत होती. पावसामुळे आशिया कप सुपर ४ सामन्यांचे यजमानपद कोलंबोमधून हिरावून घेतले जाऊ शकते, अशा बातम्या येत होत्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेला हे सामने स्वतःकडे हलवण्याचा प्रस्तावही दिला होता. परिस्थिती बिघडत असतानाच हा सामना श्रीलंकेतच अन्य ठिकाणी हलवण्याचा विचार सुरू होता.
हंबनटोटाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण तेथील हवामान उत्तम आहे. आता बातमी समोर येत आहे की आशियाई क्रिकेट परिषदेने हा सामना कोलंबोमध्येच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सामने आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार खेळवले जातील.
सुपर ४ सामने ६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. पहिला सुपर ४ सामना पाकिस्तानातील लाहोर येथे खेळवला जाणार आहे. १० सप्टेंबर रोजी आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने सुपर फोरच्या श्रीलंकेच्या लेगची सुरुवात होईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. भारत आणि नेपाळ यांच्यात खेळवण्यात आलेला सामनाही पावसामुळे वारंवार खेळ खराब केला.