कझाकस्तानमध्ये आयोजित १६व्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये सबीरा हारिसने जिंकली सुवर्णपदके
भारतासाठी आणि विशेषतः अलीगढ मुस्लिम विद्यापीठासाठी (AMU) हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. इयत्ता १२ वीची विद्यार्थिनी सबीरा हारिस हिने कझाकस्तानमध्ये आयोजित १६ व्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये केवळ एक नव्हे, तर दोन-दोन सुवर्णपदके जिंकून देशाचे नाव रोशन केले आहे. हा विजय केवळ तिच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिभेचे प्रतीक नाही, तर तो तिच्या मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांना आलेले फळ आहे.
सबीरा हारिसने या स्पर्धेत आपल्या असाधारण कौशल्याचे आणि अदम्य जिद्दीचे प्रदर्शन करत एक वैयक्तिक सुवर्णपदक आणि एक सांघिक सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे ती चॅम्पियनशिपच्या अव्वल खेळाडूंच्या यादीत सर्वात पुढे आली आहे आणि तिने हे सिद्ध केले आहे की, वय आणि परिस्थिती कधीही स्वप्नांच्या उड्डाणाला रोखू शकत नाहीत.
कठीण सुरुवात, पण सोनेरी शेवट
अंतिम सामना सबीरासाठी आव्हानात्मक होता. सुरुवातीला ती केवळ १०५ गुणांसह सहाव्या स्थानावर होती. पण हाच क्षण तिच्या जिद्दीची आणि दृढनिश्चयाची खरी परीक्षा होता. तिने संयम गमावला नाही आणि हळूहळू गुणतालिकेत वर चढत गेली. अखेरीस, तिने सर्वांना चकित करत पहिले स्थान पटकावले.
या सामन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तिने भारताच्याच आणखी एका दिग्गज खेळाडू, अद्द्या कटियालला मागे टाकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. अद्द्या ११३ गुणांसह स्पर्धेतील सर्वात प्रबळ दावेदार मानली जात होती. पण सबीराने आपल्या संतुलित कामगिरीने, मानसिक कणखरतेने आणि धोरणात्मक चातुर्याने बाजी पलटवली आणि प्रेक्षकांसाठी हा चॅम्पियनशिपचा सर्वात रोमांचक शेवट ठरला.
विद्यापीठ परिवारात आनंदाचे वातावरण
या अभूतपूर्व यशानंतर AMU परिवारात अभिमानाचे वातावरण आहे. कुलगुरू प्रो. नईमा खातून यांनी अभिनंदन करताना म्हटले, "ही विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमची विद्यार्थिनी खेळ आणि शिक्षण दोन्हीमध्ये प्रगती करत आंतरराष्ट्रीय यश मिळवत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की सबीरा भविष्यातही विद्यापीठाचे आणि देशाचे नाव रोशन करत राहील."
याच प्रसंगी, विद्यापीठ क्रीडा समितीचे सचिव प्रो. एस. अमजद अली रिझवी म्हणाले, "सबीराचा विजय हा तिच्या कठोर परिश्रमाचा, शिस्तीचा आणि खेळाप्रती असलेल्या आवडीचा परिणाम आहे. तिने केवळ अलीगढ मुस्लिम विद्यापीठालाच नव्हे, तर संपूर्ण भारताला अभिमानास्पद क्षण दिला आहे. ती तरुण खेळाडूंसाठी एक प्रेरणा आणि आदर्श आहे."
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
सबीराच्या या विजयानंतर सोशल मीडियावरही शुभेच्छांचा पाऊस पडला. देश-विदेशातून लोक तिला शुभेच्छा देत आहेत. तिच्या या कामगिरीचे कौतुक करताना अनेकांनी म्हटले की, तिने अलीगढ आणि भारताच्या ओळखीला एक नवा आयाम दिला आहे.
सबीरा हारिसची ही कामगिरी केवळ पदक जिंकण्याची कहाणी नाही. संघर्ष आणि आत्मविश्वासाने प्रत्येक आव्हानावर मात करता येते, हाच संदेश तिच्या यशातून मिळालाय. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक तरुण खेळाडूसाठी सबिराचे यश प्रेरणादायी आहे. शिक्षण आणि खेळ या दोन्हीमध्ये संतुलन साधणे शक्य आहे, हेच सबिराने आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.