आशिया कप स्पर्धा गेल्या रविवारी पार पडली आणि संयोजकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुरुवातीचे काही सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेतील पल्लिकेले मैदानावर झाले होते. त्यातील भारत-पाकिस्तान सामना निम्मा पावसाने वाया गेला. कोलंबोच्या हवामानाचा अंदाज पावसाच्याबाबतीत असा काही वर्तवला गेला होता, की खेळाडू, संयोजक, प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमे सगळ्यांच्या मनात शंकेचे काहूर माजले होते, की स्पर्धा पूर्ण होणार कशी.
नंतर संयोजकांनी गरजेचा पण क्रिकेट परंपरेला आणि नियमांना छेद देणारा निर्णय घेतला. सुपरफोर फेरीतील फक्त भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यय आला तर सामना पूर्ण व्हायला दुसरा दिवस राखून ठेवला गेला.
शेवटच्या सामन्यापर्यंत संयोजक धास्तावलेले होते. वरुणराजाने कृपा केली आणि अखेर पाऊस असूनही स्पर्धा पार पडली. काय सांगू तुम्हाला, अंतिम सामना पार पडला आणि एका तासाने असा काही जोराचा पाऊस आला, जो मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिला.
लय सापडल्याचा आनंद!
भारतीय संघाच्या दृष्टीने बरेचसे प्रश्न सुटल्याचे वाटले. जसप्रीत बुमरा दुखापतीतून सावरून परत येत होता. बुमराने वेगाने जोर लावून परिणामकारक मारा केला. के. एल. राहुलने पुनरागमन जोमाने करताना पाकिस्तानविरुद्ध झकास शतक झळकावले आणि चांगल्यापैकी विकेट कीपिंग केली.
मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून रोहित शर्माने कुलदीप यादववर विश्वास दाखवला. स्पर्धेचा मानकरी बनून कुलदीपने तो सार्थ ठरवला. अजून एक चांगला भाग म्हणजे हार्दिक पंड्याने चेंडू हाती आल्यावर चांगल्यापैकी वेगवान आणि अचूक टप्प्यावरचा मारा केला.
याचाच अर्थ असा, श्रेयस अय्यरची दुखापत बरी झाली, की भारतीय संघ तंदुरुस्त असेल. फलंदाजीच्या बाबतीत बोलायचे तर शुभमन गिलने दाखवलेली चमक लक्षणीय होती. रोहित चांगल्या रंगात वाटला. विराट आणि राहुलच्या शतकाने विश्वास वाढला.
आशिया कप अंतिम सामन्यात सिराजने केलेला भेदक मारा कायमस्वरूपी लक्षात राहणारा ठरणार आहे. म्हणजेच संघ व्यवस्थापनाला विजेतेपदापेक्षा बहुतांशी खेळाडूंना लय सापडल्याचा आनंद जास्त असेल.
धक्कादायक निर्णय
गेल्या आशिया कप स्पर्धेत पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध गमावून नंतर श्रीलंका संघाने विजेतेपदाला गवसणी घातली होती. दासून शनकाने संघाचे नेतृत्व करताना दाखवलेली धमक नजरेत भरली होती. २०२३ आशिया कप सुरू होत असताना श्रीलंका संघ ‘गतविजेता’ असे बिरुद अभिमानाने बाळगत मैदानात उतरला होता.
पाकिस्तानला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या श्रीलंका संघाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. दुर्दैवाने अंतिम सामन्यात सगळे फासे उलटे पडले. दासूनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. श्रीलंका संघाचा संपूर्ण डाव ५० धावांमध्ये आटोपला. भारतीय संघाने गरजेच्या धावा आरामात चापून काढून आशिया कप जिंकला! मग काय, धावांचे पाठबळ नसलेल्या दासूनवर टीकेचा भडिमार झाला.
मैदानावर समोर आलेल्या संघांशी दोन हात करायची तयारी दाखवणारा दासून फलंदाज म्हणून चांगली कामगिरी होत नसल्याने आधीच हळवा झाला होता. त्यातून अंतिम सामन्यातील मानहानिकारक पराभव त्याच्या जिव्हारी लागला नाही, तरच नवल होते.
आशिया कप संपला आणि दासूनने दडपण आणि टीका सहन न होऊन कप्तानपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाला दासूनची जरुरी होती. संघातील सहकाऱ्यांचा विश्वास त्याने संपादित केला होता.
तसेच प्रशिक्षकही त्याच्या जिगरबाज आणि कष्टकरी वृत्तीवर समाधानी होते. दासूनने निर्णय बदलला नाही तसेच निवड समितीने त्याच्यावरचा विश्वास सोडला नाही तर आता विश्वचषक सुरू होण्याला जेमतेम १५ दिवस उरले असताना, श्रीलंका संघाला नवीन कप्तानाच्या हाताखाली सर्वांत मोठी स्पर्धा खेळावी लागेल. असे घडले तर श्रीलंका संघासाठी फार मोठी अडचण निर्माण होणार आहे.
गुन्हेगार ठरवणे योग्य आहे का?
बाबर आझमला जगातील सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. नोव्हेंबर २०२० पासून बाबर आझमने पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. संघातील खेळाडूंच्या मनातील स्वार्थी विचार बाजूला करून सगळ्यांना संघाच्या हितासाठी खेळायचे मार्गदर्शन त्याने केले आहे तसेच प्रोत्साहनही दिले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळात दरम्यानच्या काळात बरेच बदल झाले. सुदैवाने कोणी बाबर आझमला कप्तानपदावरून हटवायचा अविचार केला नाही.
आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदा पाकिस्तान संघाला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. नंतर मोक्याच्या सामन्यात श्रीलंका संघाने पाकिस्तानला हरवले. या सगळ्याचा अपेक्षित असाच भयानक परिणाम झाला.
अगोदरच अत्यंत वाह्यात शब्दांत टीका करणाऱ्या पाकिस्तानी माध्यमांना चेव चढला. सगळ्यांनी मिळून बाबर आझम आणि पाकिस्तानी संघावर कडाडून टीका केली. माजी खेळाडू तर असे काही तुटून पडले, की मला असं वाटायला लागलं, या सगळ्यांनी त्यांच्या जमान्यात खेळलेल्या सगळ्याच सामन्यांत विजय मिळवला आहे की काय.
सगळे विश्वचषक जिंकले आहेत की काय. पाकिस्तानी संघ मायदेशी परतत असताना अगदी खाली मान घालून गेला जसे काही त्यांनी मोठा गुन्हा केला आहे. अगदी मान्य आहे, की पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक नव्हती आणि श्रीलंका संघाचा अंतिम सामन्यातील खेळ सामान्य होता. पण म्हणून त्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य वाटते का मला सांगा?
खेळावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या भावना तरल असतात. जिंकले की आनंदाने बेभान होणारे चाहते संघ पराभूत झाला, की प्रचंड निराश होतात. खास करून भारतीय उपखंडातील लोकांबाबत बोलायचे झाले, तर नेहमीच्या जीवनात लोकांना आनंद, समाधान आणि काहीतरी कमाल करून दाखविल्याचे श्रेय सहजी मिळतेच असे नाही.
रोजच्या निकडी भागवण्यासाठी खूप लोक झगडत असतात. त्याच्या तुलनेत क्रिकेटपटूंचे लाड होत असतात. त्यांना चांगल्या अर्थकारणाबरोबरच बऱ्याच गोष्टी सहजी आणि प्राधान्याने मिळत असतात. मग होतं काय, की सामान्य माणूस खेळाडूंकडून कायम सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा ठेवतो. ज्यांनी कोणताही खेळ प्राथमिक स्तरावर खेळला असेल, त्यांना कल्पना असते की नेहमी यश कधीच मिळवता येत नाही.
खेळात चढ-उतार असतातच. खराब काळ सुरू असताना खेळाडूंना आणि संघाला चाहत्यांच्या पाठिंब्याची गरज असते. भारतीय उपखंडात तसा बिनशर्त पाठिंबा बांगलादेश संघाला मिळताना मी बघितला आहे. श्रीलंका, भारत आणि पाकिस्तानचे चाहते बहुतांशी वेळा खेळाडूंच्या आणि संघाच्या मागे फक्त यश मिळवताना उभे राहतात. काही नकारात्मक विचारसरणीचे लोक असेही आढळतात, की जे आपल्या संघावर फक्त टीकाच करताना दिसतात.
२०२३ चा विश्वचषक तोंडावर आलेला असताना स्पष्ट दिसते आहे, की पुढील दोन महिन्यांत सर्व भावनांचे उद्रेक यशापयशाच्या झोपाळ्यावर बसणार आहेत. क्रिकेट चाहत्यांच्या बाबतीत एक नक्की आहे. भारतीय संघ यशस्वी ठरला तर आनंदाने डोके फिरणार आहे आणि अपयशाचा धनी झाला तर निराशेने डोके गरगरणार आहे.
मान्य आहे, की आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा खेळ अत्यंत खराब झाला. केवळ ५० धावांमध्ये संपूर्ण संघ बाद होणे आणि नंतर समोरच्या संघाने बिनबाद गरजेच्या धावा काढून सामना सहजी जिंकणे या सगळ्या गोष्टी नक्कीच मानहानिकारक होत्या. पचवायला कठीण होत्या. तरीही श्रीलंकन निवड समितीने अचानक मोठे बदल करणे घातक ठरेल असे मला वाटते.
- सुनंदन लेले