आशिया कपच्या सुपर ४ मधील दोन दिवस चाललेल्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने २२८ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानला हरवलं. भारताचा हा वनडे क्रिकेटमधील पाकिस्तानवरचा धावांच्या बाबतीतला इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. भारताकडून कुलदीप यादवने धावात ५ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला.
भारताने पाकिस्तानसमोर ३५७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. जवळपास ११ महिन्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने इमाम उल हकला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्याने कर्णधार बाबर आझमचा ११ धावांवर त्रिफळा उडवत पाकिस्तानला दुसरा आणि मोठा धक्का दिला.
या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला शार्दुल ठाकूरने अजून एक मोठा धक्का दिला. त्याने मोहम्मद रिझवानला २ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाकिस्तानची अवस्था ३ बाद ४७ धावा अशी झाली होती.
मात्र यानंतर सलामीवीर फखर झमान आणि सलमान आगाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु कुलदीप यादवच्या फिरकीसमोर पाकिस्तानच्या मधल्या फळीची भंबेरी उडाली. त्याने फखर जमान (२७) आणि आगा सलमान (२३) या दोन सेट झालेल्या फलंदाजांची शिकार करत भागीदारी रचण्याचा त्यांचा मनसुबा उधळून लावला.
त्यानंतर कुलदीपने आशिया कपमध्ये शतकी धमाका करणाऱ्या इफ्तिकार अहमदला देखील २३ धावांवर बाद करत पाकिस्तानची उरली सुरली आशा देखील संपवली. कुलदीप एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शादाब खान (६) फहीम अश्रफला (४) देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत पाकिस्तानचा निम्मा संघ गारद करण्याची किमया साधली.
पाकिस्तानचे शेवटचे दोन फलंदाज हारिस रौऊफ आणि नसीम शाह हे दुखापतग्रस्त असल्याने फलंदाजीला आले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानचा डाव ८ बाद १२८ धावातच संपुष्टात आला. भारताने २२८ धावांनी सामना जिंकत आपला पाकिस्तानवरचा सर्वात मोठा वनडे विजय साजरा केला.