भारत पाकिस्तान सामना सुरु, मात्र पावसाचे संकट कायम...

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारत पाकिस्तान मध्ये होणाऱ्या सामन्याची प्रतीक्षा आता संपली आहे. आज दुपारी ३ वजता या सामन्याला सुरुवात झाली. दोन्ही देशांमध्ये नाणेफेक झाली. भारताने बाजी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजूनही पावसाचे संकट घोंघावत आहे. 

सामन्यादरम्यान  हवामानाची स्थिती काय असेल? 
भारत - पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यावेळीत श्रीलंकेतील कँडीला बालागोल्ला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. भारत - पाकिस्तान सामन्यांची तिकीटे काही मिनिटातच विकली जातात. हा सामना देखील त्याला अपवाद नव्हता. मात्र पावसामुळे चाहत्यांची घोर निराशा होण्याची शक्यता आहे. 

भारत - पाकिस्तान हे आशिया कपमध्ये एक नाही तर तब्बल तीनवेळा एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. ग्रुप स्टेज, सुपर ४ आणि फायनल असे तीनवेळा भारत - पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही शेजारी देश फक्त आशिया कप, आयसीसी स्पर्धांमध्येच खेळतात. त्यामुळे या सामन्यावर क्रिकेट चाहत्यांचा उड्या पडणे अपेक्षितच असते.

आशिया कपमध्ये ४ सामने पाकिस्तान तर ९ सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. पाकिस्तानमध्ये उद्घाटनाचा सामना झाला आहे. तेथे पावसाचा कोणताही व्यत्यय नव्हता. मात्र भारत - पाकिस्तान सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे.

या सामन्यात पावसाची शक्यता ही ६० टक्के आहे. पाऊस साधारणपणे संध्याकाळी ५.30 ला सुरू होईल. श्रीलंकेच्या हवामान विभागाने देशाच्या अनेक भागात काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. कँडी हे केंद्रीय प्रांतात येतं. इथं शुक्रवारी आणि शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने बुधवारच्या आपल्या बुलेटीनमध्ये सांगितले की, 'पश्चिम, सबरागमुवा, केंद्रीय आणि उत्तरी प्रांतात तसेच गाले आणि मतारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जोरदार असण्याची शक्यता आहे. पश्चिम,सबरागमुवा प्रांत आणि गाले आणि मतारा जिल्ह्यात जवळपास ७५ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.'