भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पाच पदकांवर मोहोर उमटवत दमदार सुरुवात केली. रोईंग या खेळामध्ये तीन, तर नेमबाजीमध्ये दोन पदके जिंकण्यात भारताला यश मिळाले. भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेश संघाचा ८ विकेट राखून धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघाचे पदकही निश्चित झाले आहे. सुवर्णपदकासाठीच्या लढतीत त्यांच्यासमोर श्रीलंकेचे आव्हान असणार आहे.
नेमबाजी या खेळामध्ये भारताला आशियाई स्पर्धेतील पहिले पदक मिळाले. रमिता, मेहुली घोष व आशी चोक्सी या भारतीय नेमबाजांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवून दिले. तिघींनी १८८६ गुणांची कमाई केली. चीनच्या नेमबाजांनी १८९६.६ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. मंगोलियाच्या नेमबाजांनी १८८० गुणांसह ब्राँझपदकाची कमाई केली.
सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावल्यानंतर रमिता हिने महिलांच्या वैयक्तिक प्रकारात ब्राँझपदकावर मोहोर उमटवली. रमिता हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात २३०.१ गुणांची कमाई करीत तिसरे स्थान मिळवले. चीनच्या हॅन जियू हिने २५१.३ गुणांसह रौप्यपदक जिंकले. चीनच्याच ह्युयांग युतिन हिने २५२.७ गुणांसह सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. आशियाई स्पर्धेतील हा विक्रम ठरला. भारताची नेमबाजी मेहुली घोष हिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पदकांची हॅट्ट्रिक
भारतीय खेळाडूंनी रोईंग या खेळामध्ये पहिल्याच दिवशी पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्समध्ये तसेच पुरुषांच्या एट (८) प्रकारात रौप्यपदकाची कमाई केल्यानंतर पुरुषांच्या पेअर प्रकारातही ब्राँझपदकावर नाव कोरण्यात भारतीय खेळाडूंना यश मिळाले.
बाबू लाल - लेख राम जोडीला ब्राँझ
बाबू लाल - लेख राम या जोडीने रोईंगमध्ये भारताला ब्राँझपदक मिळवून दिले. दोघांनी कॉक्सलेस पेयर प्रकारात ६.५०.४१ अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली व तिसऱ्या स्थानावर मुसंडी मारली. चीनच्या खेळाडूंनी सुवर्ण आणि उझबेकिस्तानच्या खेळाडूंनी रौप्यपदक पटकावले. शिवाय रोईंग या खेळामध्येच एट (८) प्रकारात भारताने रौप्यपदकावर हक्क सांगितला. जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनितकुमार, आशीष, नीरज, नरेश कालवानिया, नितीशकुमार, चरणजीत सिंग व धनंजय पांडे यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ५.४३.०१ अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली आणि दुसरे स्थान मिळवले.