भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची लयलूट सोमवारीही कायम राहिली. पहिल्या दिवशी पाच पदकांवर मोहोर उमटवल्यानंतर भारतीयांना दुसऱ्या दिवशी सहा पदकांवर नाव कोरता आले. भारताने सुवर्णपदकाचे खातेही रुबाबात उघडले. दोन सुवर्णांसह एकूण सहा पदके पटकावण्यात भारतीय खेळाडूंना यश मिळाले. नेमबाजी व रोईंग या खेळांमधील झंझावात पुन्हा एकदा दिसून आला. क्रिकेटमध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारताची आता एकूण ११ पदके झाली आहेत.
रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश सिंग पंवर व ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. ऐश्वर्यने वैयक्तिक १० मीटर एअर रायफल प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. तसेच आदर्श सिंग, विजयवीर सिंग व अनिश भानवाला यांनी पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात ब्राँझपदक पटकावले.
विश्वविजेता रुद्रांक्ष याने ६३२.५ गुणांची कमाई केली. ऑलिंपियन ऐश्वर्यला ६३१.६ गुणांची कमाई करता आली. तसेच दिव्यांशला ६२९.६ गुण कमवता आले. भारतीय नेमबाजांनी १८९३.७ गुणांची कमाई करीत सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियाच्या नेमबाजांनी १८९०.१ गुणांसह रौप्यपदक पटकावले. चीनच्या नेमबाजांना १८८८.२ गुणांची कमाई करता आली. त्यांना ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
ब्राँझवर मोहोर, पण...
भारताच्या तीन नेमबाजांनी सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्यांना वैयक्तिक प्रकारातही पदके जिंकण्याची संधी होती. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व रुद्रांक्ष पाटील यांनी पात्रता फेरीमध्ये अचूक निशाणा साधला होता. त्यामुळे भारताला पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात सुवर्ण व रौप्य पदक जिंकण्याची आशा होती, पण प्रत्यक्षात असे झाले नाही.
चीनच्या शेंग लिहाओ याने २५३.३ गुणांची कमाई करीत सुवर्ण, तर कोरियाच्या पार्क हाझून याने २५१.३ गुणांची कमाई करीत रौप्यपदक पटकावले. ब्राँझपदकासाठी ऐश्वर्य व रुद्रांक्ष यांच्यामध्ये चुरस रंगली. ऐश्वर्यने २२८.८ गुणांसह ब्राँझपदकावर हक्क सांगितला. रुद्रांक्षला २०८.७ गुणांवरच समाधान मानावे लागले. भारताने या प्रकारात ब्राँझपदक पटकावले, पण सुवर्णपदक व रौप्यपदक जिंकण्याची संधी वाया घालवली.
टायब्रेकरमध्ये इंडोनेशियाला मागे टाकले
भारतीय नेमबाजांनी पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात ब्राँझपदक जिंकले. चीनच्या नेमबाजांनी १७६५ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. कोरियाच्या नेमबाजांनी १७३४ गुणांसह रौप्यपदक पटकावले. भारतीय नेमबाजांना ब्राँझपदकासाठी इंडोनेशियाविरुद्ध टायब्रेकरमध्ये झुंजावे लागले. भारत व इंडोनेशिया या दोन्ही देशांचे १७१८ गुण झाल्यामुळे टायब्रेकरमध्ये निकाल लागला. आदर्श सिंग, अनिश भानवाला, विजयवीर सिंग यांनी दबावाखाली खेळ उंचावला आणि भारताला ब्राँझपदक जिंकून दिले.