आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा 'धडाका'! एकाच दिवशी जिंकली एवढी पदकं

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीनच्या हँगझाऊ शहरात खेळवल्या जात आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आठवा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. भारताने रविवारी एकूण १५ पदकांची कमाई केली. भारताने अ‍ॅथलेटिक्समध्ये ९ पदकांची कमाई केली. भारताला दिवसाचं शेवटचं पदक भारताच्या बॅडमिंटन संघाने मिळवून दिलं. भारताच्या बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकलं. भारताचा अंतिन सामना चीन संघासोबत झाला होता.

तेजिंदरपाल सिंह तूर याने गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर अविनाश साबळे याने ३०००मीटर स्टीपलचेस (अडथळ्यांची शर्यत) या प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. यावेळी त्याने आशियाई विक्रम देखील मोडला.

त्यानंतर भारताची महिला गोल्फर अदिती अशोकने रौप्य पदक जिंकत इतिहास घडवला. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली महिला गोल्फर बनली आहे. तिच्या पदकाने भारताच्या दिवसाची सुरुवात झाली होती. त्यानतंर लगेच भारताच्या महिला संघाने ट्रॅप शूटींग प्रकारात रौप्य जिंकलं, तर पुरुषांनी सुवर्ण पदक जिंकलं. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या आता ५३ वर पोहोचली आहे. यात १३ सुवर्ण, २१ रौप्य आणि १९ कांस्य पदकांचा समावेश आहे.

आठव्या दिवशी भारताच्या बॅडमिंटन संघाचा सामना चीनशी झाला. यात सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी भारताला विजयी सुरुवात करुन दिली होती. त्यानंतर लक्ष्य सेननं विजय मिळवत चीनवर २-०ने वर्चस्व निर्माण केले. मात्र, चीनच्या खेळाडूंनी पलटवार करत, शेवटचे तीनही सामने जिंकले आणि सुवर्ण पदक आपल्या नावावर केले .