आशिया कप २०२३ च्या फायनलपूर्वी टीम इंडियाला बांग्लादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. कोलंबो येथे झालेल्या शेवटच्या सुपर-४ सामन्यात बांगलादेशने भारताचा ६ धावांनी पराभव केला. २०१२ नंतर आशिया कप मध्ये बांगलादेशचा भारतावर पहिला विजय ठरला आहे.
टीम इंडिया आधीच फायनलमध्ये पोहोचली होती. याच कारणामुळे या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाचा अर्धा भाग बदलला होता. मात्र, हे बदल भारताला महागात पडले आणि अंतिम सामन्यापूर्वी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्माही या पराभवाने फारसा निराश दिसला नाही.
या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाला पराभवाचा सामना का करावा लागला हे सांगितले. रोहित शर्मा म्हणाला की, वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून आम्हाला काही खेळाडू आजमावायचे होते. ही स्पर्धा आपल्याला कशी खेळायची आहे, याबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. यापैकी काही खेळाडू विश्वचषकात खेळू शकतात. अक्षर पटेलने चांगली फलंदाजी केली, पण त्याला सामना पूर्ण करता आला नाही. शेवटी त्यांनी चांगली फलंदाजी केली, पण विजयाचे श्रेय पूर्णपणे बांगलादेशला जाते.
रोहित शर्माने गिलबद्दल म्हणाला की, त्याने शानदार शतक झळकावले आणि त्याला संघासाठी काय करायचे आहे याबद्दल तो अगदी स्पष्ट आहे. गेल्या वर्षीपासून त्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे आणि तो नवीन चेंडू चांगला हाताळतो. आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो त्यावर फलंदाजी करणे सोपे नव्हते, पण गिलने उत्कृष्ट खेळी खेळली.
आता भारताचा सामना १७ सप्टेंबरला म्हणजेच रविवारी श्रीलंकेशी होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान या मोसमात चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेशने तिसर्या क्रमांकावर आपली मोहीम संपवली.