IPL 2024 : चेन्नईने मोडला मुंबईचा 'हा' विक्रम

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
चेन्नई सुपर किंग्स टीम
चेन्नई सुपर किंग्स टीम

 

इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघात पार पडला. मंगळवारी (२६ मार्च) चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ६३ धावांनी विजय मिळवला.

हा गुजरात टायटन्सविरुद्ध एखाद्या संघाने धावांच्या तुलनेत मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता. मुंबईने २०२३ आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातला २७ धावांनी पराभूत केले होते.

गुजरात टायटन्सचा सर्वात मोठा पराभव (धावांनी)
६३ धावा - विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई, २०४
२७ धावा - विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, २०२३
१५ धावा - विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई, २०२३

चेन्नईचा सुपर विजय
मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पण चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २०६ धावा केल्या.

चेन्नईकडून शिवम दुबेने २३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले. तसेच रचिन रविंद्रने २० चेंडूत ४६ धावांची खेळी केली, ज्यात त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. कर्णधार ऋतुराज गायकवाडनेही ३६ चेंडूत ४६ धावा केल्या.

याशिवाय समीर रिझवीने ६ चेंडूत १४ धावांची छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केली. गुजरातकडून राशिद खानने २ विकेट्स घेतल्या, तर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला २० षटकात ८ बाद १४३ धावाच करता आल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. तसेच डेव्हिड मिलरने २१ धावा आणि वृ्द्धिमान साहानेही २१ धावांची खेळी केली.

या तिघांव्यतिरिक्त गुजरातकडून कोणालाही १५ धावांचाही टप्पा पार करता आला नाही.

चेन्नईकडून गोलंदाजी करताना दीपक चाहर, मुस्तफिजूर रेहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर डॅरिल मिचेल आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.