फुटबॉल जगतातील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सौदी प्रो लीगमध्ये अल-शबाब विरुद्ध खेळताना रोनाल्डोने आपला १०० वा लीग गोल नोंदवला. रोनाल्डोच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर अल-नसर संघाने अल-शबाबचा ४-२ असा पराभव केला आणि गुणतालिकेत पाच गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
रोनाल्डोचा ९७१ वा गोल
४१ वर्षीय फॉरवर्ड ख्रिस्तियानो रोनाल्डोने गुरुवारी झालेल्या सामन्यात १५ मिनिटे शिल्लक असताना सादियो मानेच्या क्रॉसवर गोल केला. रोनाल्डोच्या व्यावसायिक कारकिर्दीतील हा ९७१ वा गोल ठरला आहे. यासोबतच चालू हंगामातील त्याच्या गोलांची संख्या २६ वर पोहोचली आहे. "रोनाल्डो नेहमीच आक्रमक खेळ करतो आणि आज पुन्हा एकदा त्याने ते सिद्ध केले," अशा शब्दांत अल-नसरचे प्रशिक्षक जॉर्ज जीझस यांनी त्याचे कौतुक केले.
जोआओ फेलिक्सची हॅट्ट्रिक
अल-नसरच्या विजयात जुलैमध्ये चेल्सीमधून संघात सामील झालेल्या जोआओ फेलिक्सने मोलाची भूमिका बजावली. फेलिक्सने या सामन्यात तीन गोल (हॅट्ट्रिक) झळकावून संघाची पकड मजबूत केली. या विजयानंतर ३२ सामन्यांतून ८२ गुणांसह अल-नसर पहिल्या स्थानी आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अल-हिलाल ७७ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत.
जेतेपदाचा फैसला 'डर्बी' सामन्यात
अल-नसरचा पुढचा सामना मंगळवारी त्यांच्या मुख्य प्रतिस्पर्धी अल-हिलाल विरुद्ध होणार आहे. हा सामना जेतेपदाच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतो. "आता आमचा सामना प्रतिस्पर्धी संघाशी असून ही लढत कठीण असेल. या सामन्याचे महत्त्व आम्हाला ठाऊक आहे आणि छोट्या तपशिलांवरून निकाल ठरू शकतो, त्यामुळे आम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहोत," असे प्रशिक्षक जीझस यांनी सांगितले. रोनाल्डोने २०२२ मध्ये अल-नसरशी करार केल्यापासून अद्याप सौदी अरबमध्ये एकही मोठे जेतेपद मिळवलेले नाही, त्यामुळे या हंगामात त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे.