तुरुंगात असताना बॉक्सिंग सुरू करून दोन विभागांमध्ये जागतिक विजेता बनलेले ड्वाइट मुहम्मद कावी या हॉल ऑफ फेम बॉक्सरचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या बहिण वांडा किंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून ते स्मृतीभ्रंश (dementia) या आजाराशी झुंज देत होते. शुक्रवारी (२५ जुलै) त्यांचे निधन झाले.
बाल्टिमोरमध्ये ड्वाइट ब्रॅक्सटन म्हणून जन्मलेले कावी, न्यू जर्सीच्या कॅमडेनमध्ये वाढले. सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली होती. याच काळात त्यांनी रहवे स्टेट जेलमध्ये बॉक्सिंगची सुरुवात केली होती. १९७८ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर २५ व्या वर्षी त्यांनी व्यावसायिक बॉक्सर म्हणून पदार्पण केले.
१९८२ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी कायदेशीररित्या आपले नाव बदलून ड्वाइट मुहम्मद कावी ठेवले. डिसेंबर १९८१ मध्ये त्यांनी WBC लाईट हेवीवेट बेल्ट जिंकण्यासाठी मॅथ्यू साद मुहम्मद यांना १० व्या फेरीत हरवले. आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा झालेल्या सामन्यात त्यांनी साद यांना सहाव्या फेरीत हरवले.
मायकेल स्पिंक्स यांच्याकडून पराभव झाल्यानंतर, 'द कॅमडेन बझसॉ' या नावाने प्रसिद्ध असलेले ५ फूट ७ इंच उंचीचे कावी क्रूजरवेट विभागात खेळायला लागले. जुलै १९८५ मध्ये त्यांनी पीट क्रस यांना हरवून WBA क्रूजरवेट विजेतेपद पटकावले. जुलै १९८६ मध्ये त्यांनी भविष्यातील हेवीवेट चॅम्पियन इव्हेंडर होलिफिल्ड यांच्याशी १५ फेऱ्यांची लढत गमावली.
त्यानंतर कावी हेवीवेट म्हणूनही खेळले, ज्यात जॉर्ज फोरमॅन यांनी त्यांना सात फेऱ्यांमध्ये हरवले होते. १९९८ मध्ये ४६ व्या वर्षी त्यांनी बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ४१-११-१ असा विक्रम केला, ज्यात २५ नॉकआउट विजयांचा समावेश होता. २००४ मध्ये त्यांचा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. बॉक्सिंगमधून निवृत्तीनंतर त्यांनी बॉक्सिंग प्रशिक्षक, युवा सल्लागार आणि व्यसनमुक्ती सल्लागार म्हणून काम केले.