पुण्यात महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरणार

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 1 Years ago
४५ जिल्ह्यातील कुस्ती खेळाडू होणार सहभागी
४५ जिल्ह्यातील कुस्ती खेळाडू होणार सहभागी

 

 पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर आता महिलांसाठीही प्रतिष्ठेच्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील लोणीकंद येथे महिलांच्या पहिल्यावहिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. भारतीय कुस्ती संघटनेकडून निवडण्यात आलेली अस्थायी समिती व पुणे जिल्हा कुस्ती संघटना यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


पुणे जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्याशी याबाबत संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘महिलांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला ४५ जिल्ह्यांतील कुस्ती खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ५० ते ७६ किलो वजनी गटांमध्ये महिला कुस्तीपटू सर्वस्व पणाला लावतील.’’ सध्या या स्पर्धेसाठीची पारितोषिके निश्‍चित करण्यात आलेली नाहीत. पण पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच पारितोषिके ठेवण्यात येतील, असा विश्‍वासही त्यांच्याकडून याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.


स्पर्धेचा कार्यक्रम

१ ते ३ एप्रिल - कुमार गट राज्य कुस्ती स्पर्धा

४ ते ५ एप्रिल - ग्रीको रोमन राज्य कुस्ती स्पर्धा

५ ते ७ एप्रिल - महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा

(कुमार व ग्रीको रोमन हे दोन्ही गट पुरुषांसाठी असतील)


आणखी एका स्पर्धेची घोषणा

भारतीय कुस्ती संघटनेकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्या नोटिशीला अद्याप उत्तर देण्यात आले नाही. मात्र यानंतरही त्यांच्याकडून सांगलीमध्ये महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. सांगलीमध्ये २३ व २४ मार्च रोजी ही स्पर्धा होणार आहे. जिल्हा तालीम संघातर्फे याचे आयोजन करण्यात येणार आहे.