जम्मूमध्ये क्रिकेट सामन्यात वाद; काश्मिरी खेळाडूने हेल्मेटवर लावला पॅलेस्टाईनचा झेंडा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मूमध्ये गुरुवारी एका खासगी क्रिकेट स्पर्धेदरम्यान एका काश्मिरी क्रिकेटपटूने आपल्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी झेंडा लावल्याचा प्रकार समोर आला असून, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या अनेक खेळाडूंनी दिलेल्या माहितीनुसार, फुरकान भट असे ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटपटूने पॅलेस्टिनी झेंडा असलेले हेल्मेट परिधान केले होते. जम्मू जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या 'जम्मू आणि काश्मीर चॅम्पियन्स लीग' (JKCL) मध्ये तो 'जम्मू ट्रेलब्लेझर्स' विरुद्ध 'JK११' या स्थानिक संघाकडून खेळत होता.

"संबंधित खेळाडूचा व्हिडिओ त्वरित ऑनलाइन व्हायरल झाला आणि जम्मूमधील नेटकऱ्यांनी कारवाईची मागणी केली," असे एका खेळाडूने सांगितले. ऑनलाइन व्यक्त झालेल्या या संतापानंतर जम्मू पोलिसांनी फुरकान भट आणि आयोजक जाहिद भट यांना समन्स बजावले.

या मुद्द्यावर वारंवार संपर्क साधूनही, जम्मूमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार संध्याकाळपर्यंत कोणताही एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, संबंधित क्रिकेटपटू आणि आयोजकांची पोलिसांनी चौकशी केली आहे.

जम्मूमधील अनेकांनी क्रिकेटपटूवर कारवाईची मागणी केली असताना, जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनने (JKCA) या स्पर्धेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून, "संबंधित खेळाडू असोसिएशनशी संलग्न नाही," असे त्यांनी म्हटले आहे.

जम्मूमधील भाजपनेही या खेळाडूवर कारवाईची मागणी केली आहे. "आज एक अनुचित घटना समोर आली आहे, जिथे काश्मीरमधील एका स्थानिक क्रिकेटपटूने आपल्या क्रिकेट हेल्मेटवर पॅलेस्टिनी झेंडा लावल्याचे दिसून आले. स्पष्ट आणि थेट शब्दांत सांगायचे तर, हा क्रिकेटच्या मैदानाचा वापर विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठी करण्याचा एक घाणेरडा प्रयत्न आहे, किंवा हे भारताच्या भूमिकेबद्दलचे पूर्ण अज्ञान दर्शवते," असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आर. एस. पठाानिया यांनी म्हटले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.