मोहम्मद शमीचे रौद्ररूप! रणजी सेमीफायनलमध्ये ८ विकेट्स घेत निवड समितीला दिले खणखणीत उत्तर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
मोहम्मद शमी
मोहम्मद शमी

 

टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बंगालकडून खेळताना शमीने जम्मू-काश्मीरविरुद्धच्या पहिल्या डावात तब्बल ८ विकेट्स घेत धुमाकूळ घातला. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे त्याने बीसीसीआयच्या निवड समितीला जोरदार संदेश दिला आहे की, 'मी अजून संपलेलो नाही'.

शमीचा 'पंजा' नव्हे, तर 'अष्टक'!

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या कल्याणी येथील मैदानावर सुरू असलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात शमीने आपल्या जुन्या लयीत गोलंदाजी केली. त्याने २२.१ षटकात ९० धावा देत जम्मू-काश्मीरच्या ८ फलंदाजांना तंबूत धाडले. ही शमीच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. दुखापतीतून सावरून पुनरागमन केल्यानंतर शमीची ही कामगिरी भारतीय संघासाठी सुखद धक्का मानली जात आहे.

असा फिरला सामना

बंगालने पहिल्या डावात ३२८ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना जम्मू-काश्मीरचा संघ सुस्थितीत वाटत होता. अब्दुल समद (८२) आणि कर्णधार पारस डोग्रा (५८) यांनी चौथ्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी करून बंगालच्या गोलंदाजांना जेरीस आणले होते. मात्र, शमीने ही जोडी फोडली आणि तिथून सामन्याचे चित्रच पालटले.

शमीने सुरुवातीलाच जम्मू-काश्मीरच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करून धक्के दिले होते. त्यानंतर स्थिरावलेल्या अब्दुल समदला आकाश दीपकरवी झेलबाद करत त्याने बंगालला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने शेपूट गुंडाळताना एकापाठोपाठ एक विकेट्स घेत जम्मू-काश्मीरचा पहिला डाव ३०२ धावांवर संपुष्टात आणला. यामुळे बंगालला पहिल्या डावात २६ धावांची निसटती का होईना, पण महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

निवड समितीला थेट आव्हान?

२०२३ च्या वनडे वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमी दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर होता. शस्त्रक्रियेनंतर त्याने पुनरागमन केले खरे, पण त्याला भारतीय संघात अद्याप स्थान मिळालेले नाही. त्याला बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारातूनही वगळण्यात आले होते. अशा परिस्थितीत शमीने रणजीमध्ये केलेली ही कामगिरी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि टीम मॅनेजमेंटसाठी डोळे उघडणारी ठरली आहे. शमीचा फिटनेस आणि वेग बघता, आगामी कसोटी मालिकांसाठी त्याचा विचार करणे निवड समितीला भाग पडू शकते.

सोशल मीडियावर शमीचाच डंका

शमीच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी बीसीसीआयला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. "आता तरी शमीला संघात घेणार का?" अशा आशयाचे प्रश्न विचारले जात आहेत. ३५ वर्षीय शमीने आपण आजही जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असल्याचे या स्पेलमधून सिद्ध केले आहे.

सध्या हा सामना रंजक वळणावर असून, शमीच्या या कामगिरीमुळे बंगालला फायनलमध्ये जाण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, दुसऱ्या डावात बंगालची फलंदाजी गडगडल्याने सामना अटीतटीचा झाला आहे. आता शमी दुसऱ्या डावातही अशीच जादू करून बंगालला विजय मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.