जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम फेरीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून संघाचे तोंडभरून कौतुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
जम्मू-काश्मीर रणजी करंडक संघ
जम्मू-काश्मीर रणजी करंडक संघ

 

बंगाल क्रिकेट अकादमीच्या मैदानावर जम्मू-काश्मीरने शिस्त, संयम आणि निर्णायक क्षणी केलेल्या कामगिरीच्या जोरावर बंगालचा पराभव करत इतिहास रचला आहे. दबाव असतानाही रेड-बॉल क्रिकेटचा उत्कृष्ट नमुना सादर करत या संघाने रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या डावानंतर हा उपांत्य सामना अत्यंत चुरशीच्या वळणावर होता. 

बंगालने सुदीप कुमार घरामीच्या १४६ धावांच्या जोरावर ३२८ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना जम्मू-काश्मीरने ३०२ धावा उभारल्या. अब्दुल समदच्या ८२ धावा, कर्णधार पारस डोग्राच्या संयमी ५८ धावा आणि तळाच्या फलंदाजांनी दिलेली झुंज मोलाची ठरली. आकिब नबी डारच्या ४२ आणि युधवीर सिंगच्या ३३ धावांच्या जोरावर १० व्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी झाल्यामुळे पहिल्या डावातील पिछाडी केवळ २६ धावांवर मर्यादित राहिली.

दुसऱ्या डावात आकिब नबी डार (४/३६) आणि सुनील कुमार (४/२७) यांच्या भेदक माऱ्याने यजमान बंगालचा डाव अवघ्या ९९ धावांत गुंडाळला. नबीने या सामन्यात एकूण ९ बळी घेतले. विशेष म्हणजे उपांत्यपूर्व सामन्यातही त्याने १२ बळी घेतले होते. मोहम्मद शमी, आकाश दीप, मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू संघात असूनही बंगालला जम्मू-काश्मीरचा दबाव सहन करता आला नाही. विजयासाठी मिळालेल्या १२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू-काश्मीरची सुरुवात सावध झाली. शमीने शुभम पुंडीरला बाद करून अडथळा निर्माण केला, तर आकाश दीपच्या माऱ्याने थोडी अनिश्चितता निर्माण केली होती.

मात्र अब्दुल समदने खेळाची दिशा बदलली. त्याने शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर दोन गगनभेदी षटकार ठोकून मानसिक दडपण झुगारून दिले. पहिल्या डावातील ८२ धावांनंतर दुसऱ्या डावात त्याने नाबाद ३० धावा करत आपला प्रभाव सिद्ध केला. दुसऱ्या बाजूला २२ वर्षीय वंशज शर्माने कमालीची परिपक्वता दाखवली. मुकेश कुमारच्या चेंडूवर लाँग-ऑनच्या वरून षटकार खेचत त्याने ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. शर्मा ४३ धावांवर नाबाद राहिला आणि जम्मू-काश्मीरने ३४.४ षटकांत ४ गडी गमावून १२६ धावांचे लक्ष्य गाठले. विजयानंतर मैदानात खेळाडूंनी जल्लोष केला. मुख्य प्रशिक्षक अजय शर्मा यांना खेळाडूंनी खांद्यावर उचलून घेतले.

जम्मू-काश्मीरचा अंतिम फेरीपर्यंतचा हा प्रवास अनेक दशकांच्या मेहनतीचे फळ आहे. १९५९-६० मध्ये पदार्पण केल्यापासून या संघाने ३३४ सामन्यांत केवळ ४५ विजय मिळवले होते. १९८२-८३ मध्ये सर्व्हिसेसविरुद्ध त्यांना पहिला विजय मिळाला होता. २०१३-१४ मध्ये उपांत्यपूर्व फेरी आणि २०१५-१६ मध्ये मुंबईला वानखेडेवर पराभूत करणे हीच त्यांची मोठी कामगिरी होती. या मोसमात प्रशिक्षक अजय शर्मा आणि अनुभवी पारस डोग्रा यांच्या नेतृत्वाखाली संघाने सातत्य दाखवले. 

मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी राजस्थान, दिल्ली आणि हैदराबादवर विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश केला. वसीम जाफरनंतर रणजीमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडणारा दुसरा फलंदाज ठरलेल्या पारस डोग्राने या यशाचे श्रेय सांघिक प्रयत्नांना दिले. तो म्हणाला, "अखेर हा विजय मनाला पटला आहे. लक्ष्य छोटे होते आणि विजयासाठी केवळ एका चांगल्या भागीदारीची गरज होती. अडीच दिवस बाकी असल्याने २६ धावांची पिछाडी आम्हाला घाबरवू शकली नाही."

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी संघाचे अभिनंदन केले. खेळाडूंनी जम्मू-काश्मीरच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण पान कोरले असून संपूर्ण केंद्रशासित प्रदेशाला त्यांचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे कौतुक केले. ते म्हणाले, "रणजी करंडक कोणीही एकटा जिंकू शकत नाही. हे संपूर्ण संघ आणि सहाय्यक खेळाडूंचे यश आहे. मी माझ्या वतीने आणि जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करतो. तो दिवस दूर नाही जेव्हा जम्मू-काश्मीरचे खेळाडू राष्ट्रीय संघात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील." 

आता २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक यांच्यात रणजी करंडकाचा अंतिम सामना रंगणार आहे. १८ फेब्रुवारी हा दिवस जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी एक निर्णायक वळण ठरला आहे.