आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांच्या समर्थनार्थ मोठे आवाहन करण्यात आले आहे. सुनील गावस्कर यांच्यापासून ग्रेग चॅपेलपर्यंत आणि कपिल देव, क्लाईव्ह लॉयड व स्टीव्ह वॉ यांच्यासारख्या विश्वविजेत्या कर्णधारांसह मायकेल आथर्टन आणि बेलिंडा क्लार्क अशा दिग्गज खेळाडूंनी एका संयुक्त निवेदनाव्दारे इम्रान खान यांच्यासाठी तातडीच्या आणि पुरेशा वैद्यकीय मदतीची मागणी केली आहे. सध्या तुरुंगात असलेले हे पाकिस्तानी क्रिकेट दैवता आजारी असल्याची माहिती समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या आम्ही विविध राष्ट्रीय क्रिकेट संघांच्या माजी कर्णधारांनी, जगातील महान क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांना तुरुंगात मिळत असलेल्या वागणुकीबद्दल आणि तिथल्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. इम्रान खान यांचे क्रिकेटमधील योगदान जगजाहीर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने १९९२ मध्ये ऐतिहासिक क्रिकेट विश्वचषक जिंकला. कौशल्य, जिद्द, नेतृत्व आणि खिलाडूवृत्तीवर आधारित त्या विजयाने सीमेपलीकडील अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.
आमच्यापैकी अनेकांनी त्यांच्या विरुद्ध क्रिकेट खेळले आहे, त्यांच्यासोबत मैदान सामायिक केले आहे किंवा त्यांच्या अष्टपैलू बुद्धिमत्तेचा, आकर्षणाचा आणि स्पर्धात्मक वृत्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही मोठे झालो आहोत. खेळाडू, चाहते आणि प्रशासकांकडून आदर मिळवणारे ते आजवरच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी आणि कर्णधारांपैकी एक आहेत.
क्रिकेटच्या पलीकडे जाऊन इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून एका आव्हानात्मक काळात देशाचे नेतृत्व केले. राजकीय दृष्टिकोन काहीही असले तरी, आपल्या देशातील सर्वोच्च पदावर लोकशाही पद्धतीने निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सध्या त्यांच्या आरोग्याबाबत येत असलेले अहवाल, विशेषतः कोठडीत असताना त्यांच्या दृष्टीमध्ये झालेली मोठी घसरण आणि गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगातील त्यांच्या परिस्थितीने आम्हाला खोलवर चिंता वाटत आहे.
मैदानावरील खिलाडूवृत्ती, सन्मान आणि आदराची मूल्ये समजणारे सहकारी क्रिकेटपटू म्हणून आम्हाला वाटते की, इम्रान खान यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला देशाचे माजी नेते आणि जागतिक क्रीडा आयकॉनला साजेशा सन्मानाने आणि मूलभूत मानवी विचाराने वागणूक मिळणे आवश्यक आहे. आम्ही पाकिस्तान सरकारला सन्मानपूर्वक विनंती करतो की, इम्रान खान यांना त्यांच्या पसंतीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तातडीने आणि सातत्याने वैद्यकीय उपचार मिळावेत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार त्यांना तुरुंगात सन्मानजनक वागणूक मिळावी आणि जवळच्या कुटुंबीयांना त्यांना नियमितपणे भेटू द्यावे. तसेच कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांना निष्पक्ष आणि पारदर्शक कायदेशीर प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी.
क्रिकेटने नेहमीच राष्ट्रांमधील पुलाचे काम केले आहे. मैदानावरील आमचा सामायिक इतिहास आम्हाला आठवण करून देतो की, खेळ संपल्यावर स्पर्धा संपते पण आदर कायम राहतो. इम्रान खान यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत याच भावनेचे दर्शन घडवले. आम्ही अधिकाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी न्याय आणि सभ्यतेच्या तत्त्वांचे पालन करून या भावनेचा आदर करावा. हे आवाहन कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचा पूर्वग्रह न ठेवता खिलाडूवृत्ती आणि सामान्य मानवतेच्या भावनेतून करण्यात आले आहे.
स्वाक्षरीकर्ते: मायकेल आथर्टन, ॲलन बॉर्डर, मायकेल ब्रेअर्ली, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, सुनील गावस्कर, डेव्हिड गोवर, किम ह्यूज, नासिर हुसेन, क्लाईव्ह लॉयड, कपिल देव, स्टीव्ह वॉ आणि जॉन राइट.