कोणत्याही वर्षाची सुरुवात नव्या संकल्पांनी आणि ध्येयांनी होते. २०२५ या वर्षाची सुरुवात होतानाही भारतीय क्रिकेटकडून अशाच अपेक्षा होत्या. पण जानेवारीत सुरू झालेला हा प्रवास डिसेंबर संपता संपता एका वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. वर्षाच्या शेवटी मागे वळून पाहताना 'काय ठरवले होते आणि काय झाले', असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. २०२५ हे वर्ष भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेणारे जसे ठरले, तसेच ते काही बाबतीत पिछेहाट करणारे आणि 'स्टार कल्चर'ला पूर्णविराम देणारेही ठरले.
पुरुषांचे व्हाईटबॉलमधील यश आणि धक्के
फेब्रुवारी महिन्यात दुबईत झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवला. वास्तविक ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती, पण भारताच्या विरोधामुळे ती अमिरातीत खेळवण्यात आली. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून करंडक जिंकला. फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कठीण प्रसंगी रोहितने ७६ धावांची निर्णायक खेळी करत 'अजिंक्य कर्णधार' म्हणून आपली महती सिद्ध केली.
पण नियतीचे खेळ अजब असतात. विश्वविजय मिळवल्यानंतर लगेचच २०२७ चा विचार करून रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. केवळ कर्णधारपदच नाही, तर रोहित आणि विराट कोहली यांच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मात्र, या दोन्ही दिग्गजांनी आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया करंडकावरही निर्विवाद वर्चस्व मिळवले.
दोन महानायकांचा निरोप
२०२५ हे वर्ष सचिन तेंडुलकरनंतरचे सर्वात लाडके खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीसाठी लक्षात ठेवले जाईल. जुलैतील इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवड होण्याआधीच या दोघांनी आपली कसोटी कारकिर्दी संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत हरपलेली लय या निवृत्तीला कारणीभूत ठरली असावी, असे संकेत मिळत होते. तरीही, या दोन महानायकांशिवाय कसोटी क्रिकेटची कल्पना करणे चाहत्यांसाठी कठीण होते.
कसोटी क्रिकेटमधील नामुष्की
एकदा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा भारतीय संघ आता सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे, तेही पाकिस्तानच्या मागे. मायदेशात गेल्या दोन दशकांत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपण मालिका गमावली नव्हती, पण तिथे ०-२ असा 'व्हाईटवॉश' पत्करावा लागला. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने भारताला भारतातच हरवण्याचा फॉर्म्युला शोधला आहे, ही कसोटी क्रिकेटच्या आत्म्यासाठी मोठी चिंताजनक बाब आहे. मोहम्मद सिराजच्या झुंजार प्रयत्नांमुळे इंग्लंडमधील मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली, अन्यथा तिथेही पराभवाची नामुष्की ओढवली असती.
महिलांचे 'सुवर्णवर्ष' आणि विश्वविजय
२०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने भारतीय महिला क्रिकेटसाठी मैलाचा दगड ठरले. अनेकदा विजेतेपदाच्या उंबरठ्यावरून परतणाऱ्या महिला संघाने यावेळी इतिहास रचला आणि पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. हा प्रवास सोपा नव्हता. सलामीवीर प्रतीका रावल जायबंदी झाल्यावर शेफाली वर्माला अनपेक्षितपणे संधी मिळाली आणि तिने अंतिम सामन्यात स्फोटक खेळी करून संधीचे सोने केले.
अनुभव गाठीशी असूनही एका सामन्यातून वगळल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध वाघिणीसारखी झुंज दिली. हे सर्व योगायोग नव्हते तर ते अपार कष्टाचे फळ होते. २०२५ मध्ये महिलांनी घेतलेली ही 'फिनिक्स भरारी' सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. आता आव्हान प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्वतःशीच असणार आहे, कारण इथून पुढे त्यांना 'जगज्जेते' म्हणून मैदानात उतरावे लागेल.
थोडक्यात, २०२५ने भारतीय क्रिकेटला खुप काही दिले आणि काही महत्त्वाचे हिरावूनही घेतले. व्हाईटबॉल क्रिकेटमधील भारताची हुकूमत कायम असली तरी कसोटीतील घसरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. महिला क्रिकेटने नवी पहाट अनुभवली आहे, तर पुरुष क्रिकेटमध्ये एका मोठ्या पर्वाचा अस्त झाला आहे. नव्या वर्षात इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकात आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आता संघासमोर असेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -