भारतीय महिला संघाने जिंकली न्यूझीलंडविरुद्धची मालिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
स्मृती मानधना
स्मृती मानधना

 

भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला व चषकावर आपले नाव कोरले. स्मृती माधनाने सामन्यात दमदार शतक ठोकले व माधनाच्या शतकामुळे भारताला ५ षटके राखून सामना जिंकता आला. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता ,तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला. अशा वेळी दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत असताना अंतिम सामना जिंकून भारताने मालिका आपल्या नावे केली.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे भारताचे उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण फिसकटले होते. पुढे न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली व अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद पटकावले. परंतु वर्ल्ड कपनंतर लगेचच भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाला भारताने पराभवाची धूळ चारली आहे.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २३३ धावांचे आव्हान ठेवले. न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. २५ व्या षटकांपर्यंत न्यूझीलंडने अवघ्या ८९ धावा करत ५ विकेट्स गमावले होते. पण, त्यानंतर ब्रुक हॅलिडे न्यूझीलंडचा डाव सावरला. हॅलिडेने ९६ चेंडूत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या २३२ धावांच्या खेळीमध्ये जॉर्जिया प्लिमरच्या ३९ धावांचेही योगदान आहे.

भारताला १६ धावांवर शफाली वर्माच्या (१२) रूपाने पहिला धक्का मिळाला होता. पण, पुढे स्मृती व यास्तिका भाटीयाच्या जोडीने दुसऱ्या विकेट्साठी ७६ धावांची भागीदारी केली. यास्तिका २२ व्या षटकात ३५ धावांवर झेलबाद झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने स्मृतीला साथ देत अर्थशतक ठोकले आणि भारताचा विजय जवळजवळ निश्चीत झाला.

पुढे स्मृती १२२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने शतकी खेळी करून बाद झाली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्सने हरमनप्रीतला २२ धावांची साथ दिली व भारताने ४५ व्या षटकात सामना जिंकला. सामन्यात हरमनप्रीतने ५९ धावांची नाबाद खेळी केली.

स्मृती माधनाचे विक्रमी शतक
स्मृतीने या शतकासह वन-डे मधील ८ शतके पुर्ण केली आणि एक नवा विक्रम रचला. स्मृती वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी भारतीय महिला खेळाडू ठरली. यावेळी तिने वन-डे क्रिकेटमध्ये ७ शतके करणाऱ्या मिताली राजला मागे टाकले.