भारत-पाकिस्तानमध्ये होणार एकदिवसीय मालिका?

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये २०१२-१३ नंतर द्विपक्षीय मालिकेचे आयोजन करण्यात आलेले नाही. या दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिकेच्या आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. दोन्ही देशांकडून हिरवा कंदील लाभल्यास आमच्या येथे मालिका खेळवण्यासाठी तयार आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आले.

भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश या वर्षी ऑस्ट्रेलियात मालिका खेळण्यासाठी जाणार आहेत. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार असून ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यामध्ये वनडे व टी-२० मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावरून भारत-पाकिस्तान यांच्यामधील मालिकेबाबतचा विचार सुरू झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी निक हॉकली याप्रसंगी म्हणाले, भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांची यजमानी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या दोन देशांचा सामना मेलबर्नसारख्या मोठ्या व ऐतिहासिक स्टेडियममध्ये खेळवण्यात आल्यास त्याचा आनंद काही वेगळाच असेल. त्यामुळे आम्हाला संधी मिळाल्यास द्विपक्षीय मालिकेसाठी तयार असू.

ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगी वनडे मालिकेचे आयोजन करण्यात येणे शक्य नाही, असे निक हॉकली पुढे म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सलग मालिकांमुळे तिरंगी मालिकेचे आयोजन सध्या तरी करता येणार नाही. त्यामुळे दोन्ही मंडळांकडून होकार मिळाल्यास आम्ही द्विपक्षीय मालिकेसाठी पुढाकार घेत आहोत, असे ते पुढे स्पष्ट करतात.