भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ५० षटकात ५ बाद ३९९ धावा करत मोठा इतिहास रचला. भारताची ही ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसख्या आहे. यापूर्वी २०१३ मध्ये बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३८३ धावा उभारल्या होत्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत कांगारूंचे नेतृत्व करणाऱ्या स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इथूनच कांगारू बॅकफूटवर गेले. जरी ऋतुराजच्या रूपाने कांगारूंना भारताची पहिली विकेट घेण्यात यश आले असले तरी त्यांना भारताची दुसरी विकेट घ्यायला २०० धावा वाट पाहावी लागली.
या २०० धावांच्या दरम्यान, श्रेयस अय्यरने आपले शतक पूर्ण केले होते तर शुभमन गिल आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर होता. गिलने देखील आपले सहावे वनडे शतक पूर्ण करत भारताला ३० षटकात २०० धावांचा टप्पा पार करून दिला.
गिल आणि अय्यरने रचलेल्या भक्कम पायावर केएल राहुल, इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने सोनेरी कळस चढवला. केएल ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर इशान किशनने १८ चेंडूत ३१ धावा ठोकत राहुलसोबत अर्धशतकी (५९) भागीदारी रचली.
यानंतर राहुलने सूर्यकुमारसोबत ५३ धावांची भागीदारी रचत भारताला ३५० धावांचा टप्पा पार करून दिला. ४१ व्या षटकात फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने ३७ चेंडूत नाबाद ७२ धावा ठोकल्या. याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५० षटकात ५ बाद ३९९ धावा उभारल्या.