Archery World Cup : १० वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन कोरियाला नमवून फायनलमध्ये एंट्री

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
भारतीय महिला रिकर्व्ह संघ
भारतीय महिला रिकर्व्ह संघ

 

तिरंदाजी विश्वचषक स्टेज २ मध्ये भारतासाठी गुरुवारचा दिवस संमिश्र भावनांचा ठरला. भारतीय महिला रिकर्व्ह संघाने १० वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाचा ५-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे भारताचे या स्पर्धेतील पहिले पदक निश्चित झाले असून रविवारी सुवर्णपदकासाठी भारताचा सामना चीनशी होणार आहे. मात्र, दुसरीकडे पुरुषांच्या रिकर्व्ह संघात बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्याने भारताची निराशा झाली.

अनुभवी दीपिका आणि अंकिताची चमक अनुभवी दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि तरुण तिरंदाज कुमकुम मोहोड यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने संपूर्ण स्पर्धेत संयम राखला. उपांत्य फेरीत भारताने कोरियाविरुद्ध दमदार सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये सहापैकी चार बाण १० वर मारत भारताने ५८-५५ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये भारताकडून काही चुका झाल्या तरी ५६-५६ अशा बरोबरीसह भारताने ३-१ अशी आघाडी टिकवून ठेवली. तिसऱ्या सेटमध्ये भारतीय महिलांनी ५८ गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या नवख्या संघावर सरळ सेटमध्ये मात केली.

पुरुषांच्या रिकर्व्ह संघाचा बांगलादेशकडून पराभव महिला संघाने यश मिळवले असतानाच, पुरुषांच्या रिकर्व्ह संघात अनुभवी तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा आणि यशदीप भोगे यांना पराभवाचा सामना करावा लागला. आठव्या मानांकित भारतीय पुरुषांना बांगलादेशविरुद्ध एकही सेट जिंकता आला नाही. बांगलादेशने भारताचा ६-२ असा पराभव करत स्पर्धेत खळबळ उडवून दिली. सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव आणि दडपणाखालील खराब कामगिरी यामुळे पुरुषांच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले.

मिश्र दुहेरीतही निराशा मिश्र संघ प्रकारातही भारताचे आव्हान संपले आहे. धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत या जोडीला दुसऱ्या फेरीत ब्राझीलकडून ४-५ असा पराभव स्वीकारावा लागला. शूट-ऑफमध्ये गेलेल्या या सामन्यात केंद्राच्या सर्वात जवळ असलेल्या बाणाच्या नियमामुळे ब्राझीलने बाजी मारली. आता सर्वांच्या नजरा रविवारी होणाऱ्या महिलांच्या सुवर्णपदकाच्या लढतीकडे लागल्या आहेत.