पुढील वर्षी ओडिसामध्ये खेळविण्यात येणाऱ्या हॉकी विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून; मधल्याफळीतील खेळाडू हरमनप्रीत सिंगवर कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून अमित रोहिदास याची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियामधील हॉकी मालिकेमध्ये भारताला १-४ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यांत हरमनप्रीतनेच देशाचे नेतृत्व केले होते. परंतु दारुण पराभव झाला असला तरी त्याच्यावरच विश्वास कायम ठेवण्यात आला आहे.
‘‘ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ऐतिहासिक ब्रॉंझपदक मिळाले होते. तेव्हा भारताचा कर्णधार मनप्रीत सिंग याने संघाचे नेतृत्व केले होते. परंतु भारतीय संघात अजून नेतृत्व तयार व्हावेत म्हणून आता विश्वकरंडकासाठी ही जबाबदारी हरमनप्रीतच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे ’’ असे मत मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) च्या बंगळूर येथील केंद्रात भरविण्यात आलेल्या दोन दिवसीय शिबिरानंतर विश्वकरंडकसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. एकूण ३३ खेळाडूंची चाचणी घेण्यात आली होती, त्यापैकी अंतिम १८ जणांना विश्वकरंडकात खेळायची संधी मिळणार आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समतोल साधायचा आम्ही प्रयत्न केला आहे. खेळाडूंचा सध्याचा फॉर्म आणि त्यांची तंदुरुस्ती हे दोन मुद्दे लक्षात घेऊनच त्यांची विश्वकरंडासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे ’ असे भारतीय हॉकी संघटनेने म्हंटले आहे.
हॉकी विश्वकरंडकासाठी भारताचा ड गटात समावेश आहे. भारताला बाद फेरी गाठण्यासाठी साखळी सामन्यांत स्पेन, इंग्लंड आणि वेल्सचा सामना करावा लागणार आहे. बाद फेरीचे सामने २२ आणि २३ जानेवारी रोजी खेळविण्यात येणार असून; उपांत्यपूर्व फेरीचे सामने २४ व २५ रोजी होणार आहेत. उपांत्य फेरी २७ जानेवारी रोजी खेळविण्यात येणार आहे. ब्रॉंझ पदकाचा आणि अंतिम सामना २९ जानेवारी रोजी होणार आहेत .
चौकटः- भारताचे विश्वकरंडकातील सामने
भारत विरूद्ध स्पेन (१३ जानेवारी ) ( राऊरकेला)
भारत विरूद्ध इंग्लंड ( १५ जानेवारी( राऊरकेला)
भारत विरूद्ध वेल्स ( १९ जानेवारी) (भुवनेश्वर)
हॉकी विश्वकरंडकासाठी भारतीय संघ पुढील प्रमाणेः
गोलरक्षकः कृष्णा बहादूर पाठक आणि पी.श्रीजेश
बचावफळीः जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), निलम संजीप झेस
मधलीफळीः मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांता शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग.
आक्रमकफळीः मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग.
राखीव खेळाडूः राजकुमार पाल आणि जुगरात सिंग