कोण आहेत भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या सलीमा टेटे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार सलीमा टेटे
भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार सलीमा टेटे

 

अनुभवी खेळाडू सलिमा टेटे हिच्याकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. चीनमधील हँगझू येथे ५ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आशियाई हॉकी करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची निवड करण्यात आली आहे. भारताचा २० खेळाडूंचा संघ सज्ज झाला आहे.

भारतीय महिला हॉकी संघामध्ये युवा व अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. बन्सारी सोलंकी व बिच्छू देवी खारीबाम यांची गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. निक्की प्रधान, उदिता या अनुभवी खेळाडू बचावफळीत आपला ठसा उमटवतील. त्यांना मनीषा चौहान, ज्योती, सुमन देवी व इशिका चौधरी या खेळाडूंनाही बचावफळीत चमक दाखवावी लागणार आहे.

नेहा, सलीमा, लालरेमसियामी, शर्मिला देवी, सुनेलीता टोप्पो व वैष्णवी फाळके यांच्या खांद्यावर भारताच्या मधल्या फळीची जबाबदारी अवलंबून असणार आहे. भारतीय संघाच्या आक्रमक फळीमध्ये अनुभवी व उदयोन्मुख खेळाडूंचा भरणा आहे. नवनीत कौर, संगीताकुमारी, मुमताज खान, दीपिका, ब्युटी डुंगडुंग, ऋतुजा पिसाळ या खेळाडू आक्रमक फळीमध्ये खेळतील. दरम्यान, सविता, सुशीला चानू या अनुभवी खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही.

थायलंडशी पहिला सामना
भारतीय महिला हॉकी संघाचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये भारतासह जपान, थायलंड, सिंगापूर या देशांचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचा सलामीचा सामना ५ सप्टेंबर रोजी थायलंडशी होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ६ सप्टेंबरला जपानशी दोन हात करेल. भारतीय महिला हॉकी संघाचा अखेरचा साखळी सामना सिंगापूरशी ८ सप्टेंबरला रंगणार आहे.

भारतीय महिला हॉकी संघ : गोलरक्षक- बन्सारी सोलंकी, बिच्छू देवी खारीबाम. बचावपटू- मनीषा चौहान, उदिता, ज्योती, सुमन देवी थौडाम, निक्की प्रधान, इशिका चौधरी. मधली फळी- नेहा, वैष्णवी विठ्ठल फाळके, सलीमा टेटे, शर्मिला देवी, लालरेमसियामी, सुनेलीता टोप्पो. आक्रमक फळी- नवनीत कौर, ऋतुजा पिसाळ, ब्युटी डुंगडुंग, मुमताज खान, दीपिका, संगीताकुमारी.

आक्रमक हॉकी खेळणार : हरेंद्र सिंग
भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग याप्रसंगी म्हणाले, आशियाई करंडकासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या संघामध्ये युवा व अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण आहे. आमचे लक्ष्य आक्रमक हॉकी खेळण्याकडे असणार आहे. आशियाई खंडातील सर्वोत्तम देशांना कडवी झुंज देण्याची क्षमता या संघामध्ये नक्कीच आहे.