तिलक वर्मा: ज्याच्या यशामागे आहे 'सलाम साहेबां'चा हात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि त्याचे प्रशिक्षक मोहम्मद सलाम बयाश
भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि त्याचे प्रशिक्षक मोहम्मद सलाम बयाश

 

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ६९ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून देणारा, भारतीय क्रिकेटचा नवा नायक तिलक वर्मा, आपल्या यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक मोहम्मद सलाम बयाश यांना देतो. बयाश यांनीच तिलकमधील प्रतिभा ओळखली आणि त्याला एक स्टार खेळाडू बनवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली.

ही १४ वर्षांची कहाणी तेव्हा सुरू झाली, जेव्हा तिलक हैदराबादमधील सलाम बयाश यांच्या उन्हाळी शिबिरात सामील झाला. तो धुळीच्या मैदानावर टेनिस बॉलने खेळत होता, तेव्हा सलाम यांनी त्याला पाहिले. त्यांनी त्याचे वडील, नंबूरी नागराजू यांना सांगितले की, तुमचा मुलगा प्रचंड प्रतिभावान आहे आणि त्याला क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले पाहिजे. नागराजू व्यवसायाने एक इलेक्ट्रीशियन होते.

मुलाच्या विलक्षण प्रतिभेची जाणीव असूनही, आर्थिक परिस्थितीमुळे त्याला साधे क्रिकेट किटही विकत घेऊ शकत नाही, मग क्रिकेट अकादमीत पाठवणे तर दूरच राहिले, असे नागराजू यांनी सांगितले.

यावर, बयाश यांनी लहानग्या तिलकला आपल्या पंखाखाली घेतले. त्यांनी केवळ त्याचे प्रशिक्षण शुल्कच माफ केले नाही, तर त्याच्या प्रवासाचीही जबाबदारी उचलली. बयाश रोज सकाळी ५ वाजता आपली बाईक घेऊन ४० किलोमीटरचा प्रवास करून तिलकला अकादमीत नेण्यासाठी जात.

एका वर्षाच्या आत, बयाश यांच्या मार्गदर्शनाने, त्याचे कुटुंब लिंगमपल्लीच्या जवळ स्थायिक झाले. एक कडक शिस्तीचे गुरू असलेल्या बयाश यांनी तिलकला सांगितले होते की, जेव्हा तो चांगली कामगिरी करेल, तेव्हाच त्याला बक्षीस म्हणून क्रिकेट किट मिळेल. तिलकने त्यांना निराश केले नाही आणि आपले पहिले क्रिकेट किट जिंकले.

"तिलक वर्मा २०११ मध्ये माझ्याकडे आला. तो खूप मेहनती आहे; त्याच्यात खूप संयम आहे आणि तो सूचनांचे बारकाईने पालन करतो," असे बयाश यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते.

दुबईहून हैदराबादला परतल्यावर, तिलकचे जंगी स्वागत झाले. त्यावेळी तो नेहमीच आपले प्रशिक्षक आणि मार्गदर्शक 'सलाम साहेब' यांच्यासोबत दिसत होता. वयाच्या १६ व्या वर्षी, तिलक हैदराबाद संघाकडून रणजी ट्रॉफी खेळला.

 

तिलक वर्माच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना बयाश सांगतात, "सुरुवातीला मी त्याला मूलभूत प्रशिक्षण दिले. तिसऱ्या महिन्यानंतर तो एका स्थानिक सामन्यात खेळला. त्याने लगेचच आपल्या स्वभावाने आणि तंत्राने सर्वांना प्रभावित केले. तो तासनतास सराव करत असे आणि सरावासाठी आनंदाने कौटुंबिक कार्यक्रमही सोडून देत असे. त्याची शिस्त अप्रतिम होती."

"सामन्यापूर्वी तिलकने मला फोन केला होता. मी त्याला फक्त शेवटपर्यंत क्रीजवर टिकून राहण्यास सांगितले. मला आनंद आहे की त्याने तेच केले आणि आज तो एक नायक म्हणून उदयास आला आहे. त्याच्या स्वभावाबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. लहान वयातही तो सरावादरम्यान तासनतास फलंदाजी करत असे," असे ते म्हणाले.

ते सांगतात की, पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर, त्याने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधून व्हिडिओ कॉल केला होता. तो माझ्या कुटुंबातील प्रत्येकाशी बोलला. त्याचे वडील, नागराजू आणि आई, गायत्री, सध्या नेपाळमध्ये तीर्थयात्रेवर आहेत. पूर्वी लोक मला 'बयाशचा मुलगा' म्हणत, पण आज लोक मला 'तिलकचा प्रशिक्षक' म्हणून ओळखतात, याचा मला आनंद आहे.

त्याच्या कारकिर्दीला मोठी गती मिळाली २०२२ च्या आयपीएल लिलावात. मुंबई इंडियन्सने त्याला १.७ कोटी रुपयांना विकत घेतले.

 

८ नोव्हेंबर २००२ रोजी हैदराबाद, तेलंगणा येथे जन्मलेल्या नंबूरी ठाकूर तिलक वर्माचे बालपण एका सामान्य तेलुगू कुटुंबात गेले. आर्थिक अडचणी असूनही, कुटुंबाने तिलकच्या क्रिकेटच्या आवडीला पूर्ण पाठिंबा दिला. त्याचे आई-वडील अनेकदा संसाधने कमी असतानाही, त्याच्या कारकिर्दीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत.

तिलकचे आंतरराष्ट्रीय पदार्पण २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झाले. पदार्पणातच त्याने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि नंतर अर्धशतकही नोंदवले. मात्र त्याने सर्वात अविस्मरणीय खेळी केली ती दुबईत. भारतासाठी अत्यंत कठीण परिस्थितीत नाबाद ६९ धावा करून त्याने आशिया चषकाच्या अंतिम सामन्याचे चित्रच पालटले.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter