एक तर झोकून देऊन खेळ कर किंवा सामन्यांचा ताण या कारणामुळे निवडक लढतीत खेळण्यापेक्षा पूर्ण विश्रांती घे, असा जसप्रीत बुमराला स्पष्ट आणि थेट सल्ला माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने दिला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला, इरफान पठाणने बुमराच्या चेंडूवरील अफाट कौशल्याचं कौतुक केलं, पण गरज असेल तेव्हा 'थोर्ड अधिक' देण्याचंही आवाहन केले.
मी जसप्रीत बुमराच्या कौशल्याचा चाहता आहे. तो विलक्षण आहे, पण देशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला सर्वस्व द्यावे लागते. पाच पटकांचा स्पेल झाला आणि रूट फलंदाजीला आला की तू सहावे पटक का टाकत नाही? त्यामुळे सर्वस्व दे अन्यथा नीट विश्रांती घे, अशा शब्दात पठाणने आपल्या यूट्युब चॅनेलवर म्हटले आहे.
बुमरा पाच पैकी तीनच सामन्यात खेळेल, असे इंग्लंड दौऱ्यास रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी जाहीर केले होते. यातील एका सामन्यात बुमरा खेळला नाही, परंतु आता भारतीय संघ १०२ असा पिछाडीवर असल्यामुळे बुमराला खेळावेच लागणार आहे.
बुमराच्या बांधिलकीवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, तो प्रयत्न करत नाही असे मी कधीच म्हणणार नाही, पण अनेक वेळा अधिक षटके टाकलेली आहेत, परंतु आता संघासाठी गरज निर्माण होत तेव्हा बुमराने अधिक प्रयत्न करायला हवे, असे अतिरिक्त प्रयत्न तिसऱ्या कसोटीत बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी करून दाखवले आहे, असे उदाहरण पठाणने दिले.
बुमराने हेडिंग्लेतील पहिल्या सामन्यात पहिल्या डावात पाच बळी घेतले, तर लॉर्ड्सवरच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात पाच विकेटची कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात आणखी दोन विकेट मिळवत ७/११२ अशी कामगिरी केली. तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला.