या वर्षाअखेरीस भारतात होणाऱ्या ज्युनियर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा संघ खेळण्यास येणार असल्याची माहिती हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी शनिवारी (ता. ३०) दिली.
लष्करी संघर्षानंतर सुरक्षिततेचे कारण देत पाकिस्तानने बिहारमध्ये सुरू असलेल्या आशिया करंडक स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. त्यामुळे चेन्नई व मदुराई (दक्षिण भारत) येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनिअर विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान खेळेल का, याबाबत शंका निर्माण झाली होती.
पाकिस्तानचा संघ भारतात ज्युनिअर विश्वकरंडक स्पर्धेसाठी येणार आहे. त्यांनी काल रात्री याची आम्हाला खात्री दिली. आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर मी त्यांच्याकडे या विश्वकरंडक स्पर्धेबाबत विचारणा केली होती, असे भोलानाथ यांनी सांगितले.
ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. २४ देशांपैकी २३ देशांची यादी आमच्याकडे आली आहे. फक्त पाकिस्तानकडून अधिकृत होकार शिल्लक आहे, तो आम्हाला एक-दोन दिवसांत मिळेल, अशी आशा आहे, असेही भोलानाथ म्हणाले.
पाकिस्तानसोबत कोणतेही द्विपक्षीय क्रीडा संबंध ठेवले जाणार नाहीत; मात्र बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघांना पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास मज्जाव केला जाणार नाही, असे धोरण सरकारकडून नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे.
ऑलिम्पिक धोरणांचे पालन सरकार व हॉकी इंडिया नक्कीच करेल. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतात येऊन खेळू शकतो, सरकारने त्यांच्या व्हिसालाही मंजुरी दिली आहे, तरीही पाकिस्तानचा संघ आला नाही तर त्यामागचे कारण फक्त त्यांनाच ठाऊक आहे, असे भोलानाथ म्हणाले. हॉकी इंडियाचे वरिष्ठ अधिकारी पुढे म्हणाले, की एफआयएच प्रो लीग ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे आणि भारत-पाकिस्तान सामना लागल्यास भारत नक्की खेळेल. पाकिस्तानने २०२५-२६ एफआयएच प्रो लीगमध्ये न्यूझीलंडची जागा घेतली आहे.