कौसर जहाँ : नकारात्मकतेच्या गर्तेत आशेचा नवा किरण दाखवणारी लोकसेविका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
कौसर जहाँ
कौसर जहाँ

 

कौसर जहाँ सध्या दिल्ली हज समितीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांची या पदावर निवड झाली. दिल्लीच्या इतिहासात या पदावर बसणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला आहेत.

त्यांचा लोकांशी दांडगा संपर्क आहे. जिव्हाळा आणि सहानुभूती हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. सर्वसामान्य लोकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. त्याचवेळी दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळातही त्या अत्यंत आत्मविश्वासाने आणि डौलाने वावरतात.

कौसर जहाँ यांचा जन्म एका सधन आणि प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या कुटुंबात झाला. पण वास्तवात त्यांनी आयुष्यात अनेक मोठे संघर्ष पचवले आहेत.

गेल्या वर्षी कोरोनाच्या भीषण लाटेत त्यांनी आपले आई-वडील गमावले. परिस्थिती अचानक पूर्णपणे बदलली. त्यांच्या डोक्यावरचे छप्पर तर हरवलेच, शिवाय कौटुंबिक व्यवसायालाही मोठा फटका बसला. आधीच आर्थिक संकटात असलेल्या व्यवसायाचे कंबरडे मोडले.

अशा अत्यंत दुःखद प्रसंगानंतरही त्या खचल्या नाहीत. त्यांनी स्वतःला सावरले आणि अधिक खंबीरपणे पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.

त्यांच्या दिवंगत आई बेगम फातिमा हुसैन या एका प्रतिष्ठित आणि खानदानी कुटुंबातील होत्या. त्यांच्या आईचे आजोबा नवाब फख्र-उल-मुल्क बहादूर हे निजामाच्या काळातील हैदराबादचे एक बडे शिया उमराव होते.

वडिलांच्या बाजूनेही त्यांचा वारसा मोठा आहे. त्यांच्या कुटुंबात अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ आणि महत्त्वाची राजकीय पदे भूषवलेल्या व्यक्ती आहेत.

या अत्यंत मानाच्या वारशाचा त्यांना नक्कीच सार्थ अभिमान आहे. पण आजच्या जगात फक्त वर्तमानकाळच महत्त्वाचा असतो, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. माणूस त्याच्या आजच्या वागणुकीवरून आणि समाजसेवेवरून ओळखला जातो. माणसाचे कर्तृत्व हीच त्याची खरी ओळख असते.

त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला आहे. त्यांना परदेशात स्थायिक होण्याच्या अनेक संधीही मिळाल्या. पण त्यांचा जीव नेहमीच आपल्या मातृभूमीत अडकला. कौसर जहाँ स्वतःला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी मानतात.

व्यावसायिक आयुष्यात त्यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांनी एक स्थानिक उद्योजिका आणि समाजसेविका म्हणूनही काम केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या 'संपूर्ण' या संस्थेशी त्या प्रदीर्घ काळापासून जोडलेल्या आहेत.

नुकताच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असल्याचे त्या मानतात.

दृढनिश्चय हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. समाजसेवेतून लोकांच्या जीवनात बदल घडवणे, हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. याच भावनेतून त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत झटत असतात. विशेषतः अल्पसंख्याक समाजातील महिलांना आणि गरजू महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात.

त्या एका पुरोगामी आणि एकोप्याने राहणाऱ्या कुटुंबातून येतात. माणुसकीमध्ये सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची मोठी ताकद असते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

त्यांच्या मते, आजकाल आपल्या आजूबाजूला नकारात्मक बातम्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा वेळी आपण स्वतः एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे खूप गरजेचे आहे. मग त्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात थोडासाच बदल का होईना, तो आपण घडवून आणला पाहिजे.

'देश प्रथम' आणि 'सर्वसमावेशक सलोखा' या विचारधारेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक प्रगती आणि परस्पर सामंजस्याच्या मार्गावर चालणे, हे त्यांचे ध्येय आहे. सर्वसमावेशक राष्ट्रीय विकासाच्या याच बांधिलकीतून त्या एका प्रमुख राजकीय पक्षाशी जोडल्या गेल्या आहेत.

त्यांचा उदारपणा, सौम्य स्वभाव आणि विनयशील वागणूक समोरच्यावर लगेचच छाप पाडते. पण या शांत स्वभावामागे एक अत्यंत खंबीर आणि लढाऊ वृत्ती दडली आहे.

त्या अत्यंत सक्रिय, धाडसी आणि आपल्या निर्णयावर ठाम असतात. त्यांना भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होते. एका उत्तम नेत्यामध्ये असणारे सर्व गुण कौसर जहाँ यांच्याकडे आहेत. त्या खरोखरच भविष्यातील एक अत्यंत आश्वासक नेत्या आहेत.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter