किंग्स फुटबॉल करंडकाच्या उपांत्य फेरीत भारताची इराकला कडवी झुंज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
सामन्यातील एक क्षण
सामन्यातील एक क्षण

 

चियांग माई (थायलंड) : फिफा क्रमवारीत ७० व्या स्थानावर असलेल्या इराक फुटबॉल संघाने गुरुवारी येथे झालेल्या किंग्स फुटबॉल करंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ९९ व्या स्थानावर असलेल्या भारतीय फुटबॉल संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा विजय मिळवला. इराकने या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.

रेफ्रींनी अंतिम टप्प्यात इराकला दिलेल्या पेनल्टीचा फटका भारताला बसला. भारतापेक्षा इराकचा संघ अनुभवात वरचढ आहे. तरी भारताने या सामन्यात ७९ व्या मिनिटापर्यंत २-१ अशी आघाडी घेतली होती.

त्यामुळे विजयाची संधी अधिक होती, परंतु या वेळी रेफ्रींनी इराकला पेनल्टी बहाल केली. त्यांचा स्ट्रायकर अयमन गादबन याला पेनल्टी क्षेत्रात रोखण्याचा प्रयत्न भारताच्या दोन बचाव खेळाडूंनी केली. पेनल्टी किक देण्याइतका हा मोठा फाऊल नव्हता, तरी रेफ्रींनी पेनल्टी बहाल केली. यावर गोल करून इराकने २-२ अशी बरोबरी साधली.

भारताला मात्र आता तिसऱ्या स्थानासाठी लढावे लागणार आहे. सुनील छेत्री या महान खेळाडूच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने इराकला कडवी झुंज दिली. या स्पर्धेसाठी भारतीय संघाला फक्त दोन आठवडे सराव करण्याची संधी मिळाली.

इराकविरुद्धच्या लढतीत भारताने दमदार सुरुवात केली. १७ व्या मिनिटाला महेश सिंगने भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर इराकच्या अली अल हमदी याने २८ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून बरोबरी साधली.
 
पूर्वार्धात दोन्ही देशांमध्ये १-१ अशी बरोबरी कायम राहिली. ५१ व्या मिनिटाला जलाल हसन याने स्वयंगोल केला. त्यामुळे भारताला २-१ अशी आघाडी घेता आली. लढत संपायला दहा मिनिटे बाकी असतानाच येमेन हुसेन याने पेनल्टीवर गोल करून इराकला २-२ अशी बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेतही ही बरोबरी कायम राहिली.

ब्रँडन फर्नांडिस गोल करण्यात अपयशी
भारत-इराक यांच्यामधील उपांत्य फेरीच्या लढतीचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. इराककडून मर्चास डोस्की, अली अदनान, अली हुसेन, अमीन हमावी, बशर रेसान या खेळाडूंनी गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. संदेश झिंगन, सुरेश सिंग, अनिसा अली व रहीम अली यांनी भारताकडून गोल केले; मात्र ब्रँडन फर्नांडिस याला गोल करण्यात अपयश आले.

इराकचे वर्चस्व कायम
भारत-इराक यांच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या सहा लढतींमध्ये इराकचेच वर्चस्व दिसून आले आहे. इराकने पाच लढतींमध्ये विजय मिळवला होता. एक लढत अनिर्णित राहिली होती. इराकने भारताविरुद्धची विजयी परंपरा या लढतीतही कायम राखली.

त्यांनी भारताला सहाव्यांदा पराभूत केले. भारत-इराक यांच्यामध्ये तब्बल १३ वर्षांनंतर लढत झाली. या दोन देशांमध्ये अखेरची लढत २०१० मध्ये रंगली होती. त्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत इराकने २-० असे यश मिळवले होते.

मायदेशातील यशानंतर परदेशात निराशा
भारतीय फुटबॉल संघ इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही काळामध्ये उल्लेखनीय खेळ करीत आहे. भारतीय फुटबॉल संघाने या वर्षी मार्च ते जुलै या कालावधीत तीन स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली. मार्च महिन्यात तिरंगी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले. जून महिन्यात भुवनेश्‍वर येथे आंतरखंडीय स्पर्धा जिंकली.

त्यानंतर जुलै महिन्यात बंगळूरमध्ये सॅफ स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली; मात्र परदेशात भारताला निराशेला सामोरे जावे लागले. भारतीय संघ २०२४ मधील आयोजित एएफसी आशियाई करंडकासाठी सज्ज होत आहे. त्याआधी भारतीय संघ प्रत्येक महिन्यात आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.