आशिया कप २०२५च्या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. युएईमध्ये ९ सप्टेंबरपासून ही स्पर्धा खेळली जाणार आहे. याचा अंतिम सामना २८ सप्टेंबरला होणार आहे. चाहत्यांना या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. भारतात पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. यानंतर पाकिस्तानसोबत कोणत्याही स्पर्धेत न खेळण्याचा भारताचा विचार होता.
पण आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबरला होणार असल्याचं आता वेळापत्रकावरून दिसतंय. भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावरून टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केलाय.
अजहरुद्दीन यांनी म्हटलं की,"भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच व्हावी, पण जर आपण त्यांच्याशी द्विपक्षीय मालिका खेळत नाहीय तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही खेळलं नाही पाहिजे." भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२-१३ मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका झाली होती. यानंतर दोन्ही देश द्विपक्षीय मालिका खेळले नाहीत. मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांविरोधात खेळले आहेत.
आशिया कपचं शेड्युल समोर येताच अजहरुद्दीन यांनी म्हटलं की, "मी नेहमीच म्हणतो की एकतर सगळं व्हायला पाहिजे किंवा तसं नसेल तर काहीच झालं नाही पाहिजे. जर तुम्ही द्विपक्षीय मालिका खेळत नाहीय तर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धातही खेळलं नाही पाहिजे. मला तरी हेच वाटतं. पण सरकार आणि बोर्ड जे ठऱवेल तेच होईल."
नुकत्याच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसुफ पठाण यांसारख्या दिग्गजांनी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला होता. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतली होती. भारतीय खेळाडूंच्या बहिष्कारामुळे सामनाच रद्द करावा लागला.
यावर प्रतिक्रिया देताना अजहरुद्दीन यांनी म्हटलं की, "दिग्गजांची लीग ही अधिकृत स्पर्धाच नाहीये. आयसीसी किंवा बीसीसीआयकडून याला मंजुरी नाही. पण आशिया कप अधिकृत स्पर्धा आहे. त्यामुळे यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा."